मुंबई : तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने आगामी आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी आपण उपलब्ध असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळविले आहे. काही दिवसांपूर्वी बुमरा आणि निवड समिती सदस्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
यंदा आशिया चषक स्पर्धा ट्वेन्टी-२० प्रारूपात संयुक्त अरब अमिराती येथे ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी (१९ ऑगस्ट) मुंबई येथे करण्यात येईल. त्यापूर्वी बुमरा आणि अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये चर्चा झाली.
‘‘आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी आपण उपलब्ध असल्याचे बुमराने निवड समितीला कळविले आहे. निवड समिती या आठवड्यात भेटून पुढील निर्णय घेईल,’’ असे ‘बीसीसीआय’मधील सूत्राने सांगितले.
गेल्या काही काळापासून बुमराच्या तंदुरुस्तीबाबत बरीच चर्चा केली जात आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात कार्यभार व्यवस्थापनांतर्गत बुमरा पाचपैकी दोन कसोटी सामन्यांना मुकला. तो हेडिंग्ली येथील पहिला सामना खेळला, मग एजबॅस्टन येथील दुसऱ्या सामन्याच्या वेळी त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर लॉर्ड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीसाठी त्याचे पुनरागमन झाले. ओल्ड ट्रॅफर्ड येथील चौथ्या कसोटीतही तो खेळला. मात्र, भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर असूनही बुमराने मालिकेतील निर्णायक पाचवा सामना खेळणे टाळले. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही झाली.
बुमराने कसोटी मालिकेदरम्यान एकूण ११९.४ षटके टाकली आणि दोन वेळा डावात पाच बळी मिळविण्याची कामगिरी केली. मात्र, तो तीन कसोटीत खेळला, त्यापैकी दोनमध्ये भारतीय संघ पराभूत झाला, तर एक कसोटी अनिर्णित राहिली. त्याच्या अनुपस्थितीत भारताने उर्वरित दोनही सामने जिंकताना मालिका बरोबरीत सोडवली.
सध्या विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज अशी ख्याती असलेल्या बुमराला कारकीर्दीदरम्यान विविध दुखापतींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता त्याच्याबाबतीत अधिक खबरदारी बाळगली जात आहे. आशिया चषक स्पर्धा ट्वेन्टी-२० प्रारूपात होणार असल्याने बुमराला मोठे स्पेल टाकावे लागणार नाहीत. शिवाय, साखळी फेरीत भारताला पाकिस्तानव्यतिरिक्त ओमान आणि संयुक्त अरब अमिराती या तुलनेने दुबळ्या संघांविरुद्ध खेळायचे असल्याने गरज वाटल्यास बुमराला विश्रांतीही दिली जाऊ शकेल.
भारतीय संघाने गेल्या वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. भारताच्या विश्वविजयात बुमराने निर्णायक भूमिका बजावली होती. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता. अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने चार षटकांत केवळ १८ धावांच्या मोबदल्यात दोन बळी मिळवण्याची अप्रतिम कामगिरी केली होती. बुमराचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना होता. आता आशिया चषकात त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे. त्याने आतापर्यंत एकूण ७० आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने खेळले असून त्यात ८९ बळी मिळवले आहेत.
पूर्णपणे तंदुरुस्त…
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराने खेळलेला अखेरचा कसोटी सामना आणि आशिया चषकाचा पहिला सामना यात जवळपास ४० दिवसांचे अंतर असेल. त्यामुळे बुमरा पूर्णपणे तंदुरुस्त आणि ताजातवाना असणे अपेक्षित आहे.
सरावासाठी लवकर ‘प्रस्थान’
– आशिया चषक स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. मात्र, परिस्थितीशी जुळवून घेता यावे आणि सरावासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी भारतीय संघ स्पर्धेच्या काही दिवस आधीच संयुक्त अरब अमिराती गाठेल.
– बंगळूरु येथे सराव शिबिराच्या आयोजनाची ‘बीसीसीआय’ने तयारी दर्शवली होती. मात्र, संघ व्यवस्थापनाने बंगळूरुपेक्षा थेट अमिराती येथेच सराव करण्यास पसंती दर्शवली.
– ‘‘स्पर्धेपूर्वी भारतात सराब शिबीर होणार नाही. खेळाडू स्पर्धेच्या तीन-चार दिवसांपूर्वी अमिराती गाठतील. त्यामुळे त्यांना सरावासाठी वेळ मिळू शकेल,’’ असे सूत्राने सांगितले. आशिया चषकापूर्वी सराव सामना होणार नसल्याने खेळाडूंना नेट्समध्येच घाम गाळावा लागेल.