पीटीआय, नवी दिल्ली
इंग्लंडविरुद्धच्या यशस्वी मालिकेनंतर आता भारतीय चाहत्यांना आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेचे वेध लागले असून, सर्वाधिक चर्चा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची उपलब्धता आणि उपकर्णधाराच्या नियुक्तीवरून सुरू आहे.
आशिया चषक स्पर्धा ट्वेन्टी-२० प्रारूपात असल्यामुळे बुमराला अधिक गोलंदाजी करावी लागणार नाही. त्यामुळे या स्पर्धेत बुमरा खेळण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, त्यामुळे बुमराला स्पर्धेपाठोपाठ लगेच होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी विश्रांती दिली जाईल असे मानले जात आहे.
‘बीसीसीआय’च्या उत्कृष्टता केंद्रातील (सेंटर ऑफ एक्सलन्स) तज्ज्ञ भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत वैद्यकीय अहवाल कधी पाठवते यावर या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड अवलंबून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार १९ किंवा २० ऑगस्ट रोजी संघ निवडण्यासाठी निवड समितीची बैठक होऊ शकते.
निवड समितीला काही कठीण निर्णय घ्यावे लागणार असले, तरी कर्णधारपदात बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चांगले यश मिळविले आहे. निवड समितीसमोर फक्त उपकर्णधाराच्या नियुक्तीचा पेच असेल. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना अक्षर पटेलला उपकर्णधार करण्यात आले होते. आता दौरा संपल्यावर निवड समिती कर्णधार शुभमन गिलकडे वळणार की अक्षरलाच कायम ठेवणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या ही पहिली पाच नावे निश्चित मानली जात असली, तरी इंग्लंडमधील गिलची लय लक्षात घेता त्याला विसरता येणार नाही. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शनसाठीदेखील संघात जागा शोधणे निवड समितीला त्रासदायक ठरणार आहे.
कोण बसणार संघ रचनेत
– यष्टिरक्षक : पहिली पसंती संजू सॅमसन. त्यानंतर दुसऱ्या यष्टिरक्षकासाठी जितेश शर्मा, ध्रुव जुरेल शर्यतीत.
– अष्टपैलू : हार्दिक पंड्याला पहिली पसंती. नितीश कुमार रेड्डी स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी. त्यामुळे शिवम दुबेच्या समावेशाची शक्यता.
– वेगवान गोलंदाजी : जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग यांचे स्थान जवळपास निश्चित. त्यानंतर प्रसिध कृष्णा, हर्षित राणा यांच्यात स्पर्धा.
– फिरकी गोलंदाज : अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाच पसंती. अष्टपैलू म्हणूनही विचार.