जयदेव उनाडकच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत गुजरातवर ९२ धावांनी मात करत सौराष्ट्राने अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. अंतिम फेरीत सौराष्ट्राची गाठ बंगालशी पडणार आहे. शेल्डन जॅक्सनच्या शतकी खेळाच्या जोरावर सौराष्ट्राने पहिल्या डावात ३०४ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल गुजरातचा संघ पहिल्या डावात २५२ धावांपर्यंतच मजल मारु शकला. गुजरातकडून रुजुल भट आणि अखेरच्या फळीत चिंतन गजाने अर्धशतकी खेळी करत चांगली झुंज दिली. सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने पहिल्या डावात ३ बळी घेतले.
दुसऱ्या डावात सौराष्ट्राची सुरुवातही खराब झाली होती. १५ धावांमध्ये निम्मा संघ माघारी परतल्यामुळे सौराष्ट्र अडचणीत सापडला होता. मात्र मधल्या फळीत चेतन सकारियाच्या ४५ धावा, अर्पित वसवडाचं शतक आणि चिराग जानीच्या अर्धशतक झळकावत सौराष्ट्राला २७४ धावांपर्यंत मजल मारुन दिली. दुसऱ्या डावात गुजरातकडून चिंतन गजाने ७ बळी घेतले. गुजरातला विजयासाठी ३२७ धावांचं आव्हान देण्यात आलं.
दुसऱ्या डावात गुजरातची पुरती घसरगुंडी उडाली. कर्णधार जयदेव उनाडकटने गुजरातच्या डावाला खिंडार पाडलं. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे गुजरातच्या डावाला स्थैर्य लाभलं नाही. कर्णधार पार्थिव पटेल आणि चिराग गांधीने अनुक्रमे ९३ आणि ९६ धावांची खेळी करत चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला..मात्र सौराष्ट्राच्या गोलंदाजांसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. कर्णधार उनाडकटने दुसऱ्या डावात ७ बळी घेतले. जयदेव उनाडकटने या कामगिरीदरम्यान रणजी करंडकात एका हंगामात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावे जमा केला. या हंगामात उनाडकटच्या नावावर ६५ बळी जमा झाले आहेत. १९९८-९९ साली कर्नाटकच्या दोड्डा गणेश यांनी एका हंगामात ६२ बळी घेतले होते. यानंतर तब्बल २१ वर्षांनी उनाडकटने हा विक्रम आपल्या नावे जमा केला.