Jemimah Rodrigues Cried In Press Conference: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. नॉकआऊट सामन्यांमध्ये अनेकदा ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघावर भारी पडला आहे. त्यामुळे या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचं पारडं जड होतं. पहिल्या डावात ३३८ धावांचा डोंगर उभारल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शक्यता आणखी वाढली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना वाटू लागलं होतं की, त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पण भारताकडून हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्जने शेवटपर्यंत झुंज दिली. दरम्यान भारतीय संघाला विजय मिळवून दिल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज भावुक झाली.

भारतीय संघ अडचणीत असताना जेमिमा रॉड्रिग्जने दमदार शतकी खेळी केली. शेवटपर्यंत मैदानावर टिकून फलंदाजी करून तिने भारतीय संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं. दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना ती भावुक झाली.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली, “स्पर्धेच्या सुरुवातीला मी खूप चिंतेतून (anxiety) जात होते. मी माझ्या आईला फोन करायचे आणि खूप रडायचे. संपूर्ण वेळ फक्त रडण्यातच जात असे. कारण जेव्हा anxiety चा त्रास होतो तेव्हा सर्वकाही सुन्न झाल्यासारखं वाटतं.”

तसेच ती पुढे म्हणाली, “काय करावं हेच कळत नव्हतं, मी नॉर्मल राहण्याचा खूप प्रयत्न केला. या काळात मला माझ्या आई – वडिलांनी धीर दिला. तसेच अरुंधती रेड्डी अशी खेळाडू आहे जिच्यासमोर मी रोज रडायचे. नंतर मी तिला मस्करीमध्ये म्हणायचे की, तू माझ्यासमोर येऊ नकोस, नाहीतर मी पुन्हा रडेल.”

संघातील युवा खेळाडू अडचणीत असताना नेहमी वरिष्ठ खेळाडू मदतीला धावून येतात. जेमिमाच्या मदतीला स्मृती मानधना धावून आली. “तिने दररोज माझी विचारपूस केली. मी कुठल्या परिस्थितीतून जात आहे हे तिला माहीत होतं. काही नेट सत्रांदरम्यान ती तिथे उभी असायची. कालही ती तिथेच उभी होती. फार काही म्हणाली नाही, कारण तिला माहीत आहे की, तिची उपस्थिती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.” असं स्मृती मानधनाबद्दल बोलताना जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली.