महिला क्रिकेटमध्ये अजिंक्य मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध अद्भुत असा विजय मिळवत भारतीय संघाने इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेलं डोंगराएवढं ३३९ धावांचं लक्ष्य भारतीय संघाने ५ विकेट्स आणि ९ चेंडू राखून गाठलं. या विजयाची नायक ठरली मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज. वूमन्स क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पुनरागमन करण्यासाठी ओळखला जातो. मात्र या लढतीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला कोणतीही संधी न देता सर्वसमावेशक खेळाच्या जोरावर अविश्वसनीय विजय साकारला.
ऑस्ट्रेलियाला साडेतीनशे धावांच्या आत रोखलं
टॉस जिंकून बॅटिंग घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या १० षटकातच इरादे स्पष्ट केले होते. फोबी लिचफिल्डने सूत्रधाराची भूमिका स्वीकारत शानदार शतकी खेळी साकारली. एलिसा पेरीने ७७ धावांची खेळी करत तिला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाचा संघ मोठ्या स्पर्धांमध्ये मोठ्या सामन्यांमध्ये सामन्यावरची पकड निसटू देत नाही. ३०व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या दोनशे धावा होत आल्या होत्या. त्या रनरेटचा विचार करता ऑस्ट्रेलिया ३७० किंवा त्यापेक्षा मोठी धावसंख्या गाठणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती. आऊटफिल्ड अतिशय वेगवान अशी होती. त्यांच्या हातात खूप विकेट्स होत्या. मात्र भारतीय संघाने शिस्तबद्ध मारा करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला वेसण घातली. एकाक्षणी ऑस्ट्रेलिया ४०० पार होणार असं चित्र असताना प्रत्यक्षात मात्र ऑस्ट्रेलियाला ३३८ धावाच करता आल्या. २१वर्षीय श्री चरणीने फारसा अनुभव गाठीशी नसतानाही हाणामारीच्या षटकात चांगली गोलंदाजी केली. ३४व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद २२० धावा होत्या. ऑस्ट्रेलियाला ३५०च्या आत रोखल्यामुळेच ही धावसंख्या पार करू शकतो हा विश्वास मिळाला. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फटके खेळू शकतात तर आपणही खेळू शकतो ही भावना रुजली.
दव आलं, नियंत्रण सुटलं
ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेत दवाचा मुद्दा कळीचा ठरणार हे स्पष्ट होतं. गेले काही दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस झाला होता. सेमी फायनलच्या लढतीवरही पावसाचं सावट होतं. थोडा वेळ सामना पावसामुळे थांबलाही होता. मात्र पावसाऐवजी दव आलं आणि ऑस्ट्रेलियाचं सामन्यावरचं नियंत्रण सुटलं. दवामुळे चेंडू ग्रिप होणं अवघड होते. चेंडू हातातून निसटतो. चेंडूवर नियंत्रणच न राहिल्यामुळे विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही गोष्टी ऑस्ट्रेलियासाठी अवघड झाल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ पुनरागमन करण्यात माहीर आहे. पण दवासमोर ते हैराण झालेले दिसले. टॉवेल्सच्या साथीने चेंडू सुकवण्याचे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
भागीदाऱ्यांनी जिंकला गड
वनडे मुकाबल्यात भागीदाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. भारतीय संघाने यावर भर देत खेळ केला. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा झटपट बाद झाल्यावरही जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५६ चेंडूत १६७ धावांची मोठी भागीदारी रचली. हरमनप्रीत बाद झाल्यानंतरही जेमिमाने दीप्ती शर्मासह ३८, ऋचा घोषबरोबर ४६ तर अमनजोत कौरसह ३१ धावांची भागीदारी केली. एका खेळाडूने सूत्रधाराची भूमिका स्वीकारायची आणि बाकीच्यांनी तिला साथ द्यायची हे तंत्र अवलंबत भारतीय संघाने खेळ केला. विकेट पडल्यानंतर नवा फलंदाज काहीसा वेळ घेतो. धावगती मंदावते. पण दीप्ती असो किंवा ऋचा यांनी आल्या क्षणापासून आत्मविश्वासपूर्ण खेळ केला. या सगळ्यांनी जेमिमाला मोलाची साथ दिली. भागीदाऱ्यांवर भर देत धावगतीचं दडपण येणार नाही याची काळजी घेत भारतीय संघाने अशक्य वाटणारा विजय साध्य केला.
जेमिमा रॉड्रिग्जची मॅरेथॉन इनिंग्ज
सेमी फायनलची लढत, प्रचंड असं लक्ष्य आणि दोन शिलेदार तंबूत परतलेले- अशा स्थितीत खेळायला सुरुवात करणाऱ्या जेमिमाने वनडे क्रिकेटमधल्या अफलातून खेळींपैकी एक सादर केली. जेमिमाने चौकार आणि एकेरी-दुहेरी धावा यांचा सुरेख मिलाफ साधला. पहिल्या चेंडूपासून उत्तम लयीत खेळणाऱ्या जेमिमाने १३४ चेंडूत १४ चौकारांसह नाबाद १२७ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. शतकानंतर सेलिब्रेशन न करत जेमिमाने परिपक्वता दाखवली. शतकापेक्षा संघाला विजय मिळवून देणं महत्त्वाचं आहे हे तिच्या पक्कं ध्यानात होतं. म्हणूनच शतकानंतर तिने फक्त प्रेक्षकांना अभिवादन केलं. अनुभवी हरमनप्रीत बाद झाल्यावरही जेमिमा डगमगली नाही. दीप्ती आणि ऋचा बाद झाल्यानंतरही जेमिमाचा जिंकून देण्याचा निर्धार कमी झाला नाही. ५० षटकं फलंदाजी केल्यानंतर जेमिमाने जवळपास ५० षटकं फलंदाजी केली. यातूनच तिचा फिटनेस किती उत्तम आहे हे सिद्ध झालं. प्रचंड उष्ण आणि दमट वातावरणात तसंच सेमी फायनलच्या दडपणाखाली जेमिमाने कारकिर्दीतली सर्वोत्तम खेळी साकारली. सेमी फायनलमधल्या भारताच्या विजयाची नायक निर्विवादपणे जेमिमाच आहे.
ऑस्ट्रेलियाची स्वैर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण
ऑस्ट्रेलियाचा महिलांचा संघ अत्यंत व्यावसायिक संघांपैकी एक आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच त्यांनी वर्ल्डकप मुकाबला गमावला. ३३८ धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं आवश्यक होतं. मात्र ऑस्ट्रेलियाला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. झेल सुटणं हे ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत अतिशय दुर्मीळ आहे. कर्णधार एलिसा हिलीने शतकवीर जेमिमा रॉड्रिग्जचा झेल सोडला. हा झेल ऑस्ट्रेलियाला चांगलाच महागात पडला. यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी नियमित झेल सोडले. खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती. अशा वेळी विकेट्स पटकावणं अत्यावश्यक होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने विकेट्सही पटकावता आल्या नाहीत आणि धावाही रोखता आल्या नाहीत.
