Jemimah Rodrigues On Sachin Tendulkar: नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा थरार रंगला. सहज हार न मानणाऱ्या ऑस्ट्रेलियाला २५ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्जने गुडगे टेकायला भाग पाडलं. नाणेफेक जिंकून ३३८ धावांचा डोंगर उभारल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हवेत होता. पण दुसऱ्या डावात शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला जमिनीवर आणण्याचं काम जेमिमा रॉड्रिग्जने केलं. आधी हरमनप्रीत कौरसोबत शतकी भागीदारी केली आणि त्यानंतर शतक झळकावून भारताला अंतिम फेरीत पोहोचवलं. दरम्यान तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
सचिन तेंडुलकरला पाहून झाली प्रेरित
आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे अनेक खेळाडू आहेत जे सचिन तेंडुलकरला खेळताना पाहून प्रेरित झाले आहेत. जेमिमा रॉड्रिग्ज देखील त्यापैकीच एक आहे. जेमिमाच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मॅशबल इंडियाच्या ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात बोलताना जेमिमाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जुन्या घरातील एक प्रेरणादायी आठवण सांगितली.
भारताने २०११ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून जेतेपदाचा मान मिळवला होता. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. ज्यावेळी ही स्पर्धा झाली त्यावेळी जेमिमा अवघ्या ११ वर्षांची होती. ती तिच्या वांद्रे येथील घराच्या बाल्कनीत उभी होती. तिच्या घरा शेजारी सचिन तेंडुलकरची जुनी इमारत होती. जिथे सचिन आधी राहायचा. वर्ल्डकप जिंकून सचिन सरांची गाडी इमारतीजवळ आली त्यावेळी प्रचंड गर्दी होती. रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. या गर्दीतून जेमिमाने सचिनला जाताना पाहिलं. त्यावेळी सचिनला पाहून जेमिमा प्रेरित झाली.
जेमिमा म्हणाली, “त्यावेळी मला वर्ल्डकप जिंकणं काय असतं हे माहीत नव्हतं. मात्र, भारतातील चाहत्यांमध्ये सचिन सरांबद्दलची ती भावना आणि उत्साह पाहून मला कळून चुकले की, जर चाहत्यांसाठी याचा एवढा अर्थ असेल, तर मलाही भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे.” जेमिमाने २०११ साली पाहिलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरू शकते. भारताचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
