भारताच्या जेसी जोसेफचे आशियाई कुमार मैदानी स्पर्धेतील आठशे मीटर धावण्यात सुवर्णपदक थोडक्यात हुकले. तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या रौप्यपदकासह भारताने शनिवारी येथे दोन रौप्य व एक कांस्य अशी तीन पदकांची कमाई केली.
ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू पी.टी.उषा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या जेसी हिने आठशे मीटर शर्यतीत उपांत्य व अंतिम या दोन्ही शर्यती केल्या त्यामुळे त्याचा परिणाम तिच्या कामगिरीवर झाला. तिने ही शर्यत २ मिनिटे ६.७७ सेकंदांत पार केले. जपानच्या रियोको हिरानो हिने हे अंतर २ मिनिटे ६.७५ सेकंदांत पार करीत सोनेरी कामगिरी केली. भारताच्या अर्चना आढाव हिने कांस्यपदक मिळविताना २ मिनिटे ९.११ सेकंद वेळ नोंदविली.
जपानच्या माको फुकुबेने शंभर मीटर अडथळा शर्यत १३.९८ सेकंदांत जिंकली.
भारताच्या मेघना शेट्टी हिने रौप्यपदक मिळविताना १४.०९ सेकंद अशी स्वत:ची सर्वोत्तम वेळ नोंदविली. सिंगापूरच्या वुंगमिन जेनाह हिला कांस्यपदक मिळाले. भारताच्या सचिन दलालसिंग याला मात्र थाळीफेकमध्ये पदक मिळविण्यात अपयश आले.
ओडिशाची धावपटू दुती चंद हिने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत स्थान मिळविले. तिने पात्रता फेरीत २३.५७ सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र तिची सहकारी हिमांश्री रॉय हिचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले.