क्रीडा क्षेत्रामध्ये महिला खेळाडू पुरुष खेळाडूंच्या तोडीसतोड कामगिरी करत आहेत. विशेषत: भारतीय क्रिकेटचा विचार केला तर, गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने पुरुष संघाच्या कामगिरीची बरोबरी करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. मात्र, महिला खेळाडूंना पुरुष खेळाडूंच्या तुलनेत थोड्या जास्त आव्हानांचा सामना करावा लागतो. यामध्ये मासिक पाळी ही सर्वात मोठी समस्या आहे. भारताची वरिष्ठ महिला गोलंदाज झुलन गोस्वामीने याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

भारताचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण यांच्या युट्यूब कार्यक्रमामध्ये झुलन गोस्वामी पाहुणी म्हणून उपस्थित होती. या कार्यक्रमामध्ये तिने मासिक पाळी दरम्यान महिला खेळाडूंची अवस्था कशी असते? याबाबत मोकळेपणाने चर्चा केली. ती म्हणाली, “मासिक पाळीचा खेळाडूंवर काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी अधिक वैज्ञानिक संशोधनाची गरज आहे. विशेषत: क्रिकेटसारख्या खेळांबाबत तर याची नितांत गरज आहे. कारण, क्रिकेटमध्ये खेळाडूला सहा तासांपेक्षा जास्त काळ मैदानात उभे रहावे लागते.”

“मी जेव्हा नवीन होते तेव्हा या विषयावर बोलूही शकत नव्हतो. कितीही त्रास होत असला तरी मी याबाबत प्रशिक्षकांना सांगू शकत नव्हते. मात्र, आता काळ बदलला आहे. याबाबत संशोधन होऊन काहीतरी उपाय निघायला पाहिजे”, असेही झुलन म्हणाली.

हेही वाचा – Asia Cup : एमएस धोनी-तस्किन अहमदचा ‘तो’ फोटो ते गंभीर-अकमलची एकमेकांना शिवीगाळ; जाणून घ्या आशिया चषकातील वादग्रस्त घटना

झुलनने रमण यांच्याशी बोलताना सांगितले, “महिला खेळाडूंसाठी मासिक पाळी सर्वात मोठा आव्हानात्मक भाग आहे. जर स्पर्धेच्या काळात मासिक पाळी आली तर खेळावर लक्ष केंद्रित करणे कठिण होते. अशा स्थितीत तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असणे आवश्यक आहे. खेळाडूची स्थिती कशी आहे, हे लोकांना माहिती नसते. लोक अगदी सहजपणे बोलतात, ‘अरे हिला काय झालंय?”

महिला खेळाडू संप्रेरकांतील बदलांना कशा प्रकारे सामोऱ्या जातात, याबाबतही झुलन गोस्वामीने सांगितले. ती म्हणाली, “शारिरीक वेदना आणि मासिक पाळीतील वेदनांमध्ये फरक असतो. शरीराच्या अंतर्गत भागात होणारे बदल हे आव्हानात्मक असतात. सामना सुरू असताना हे जास्त कठीण होते. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी खूप धैर्य लागते. मासिक पाळीच्या काळात क्रिकेटच्या मैदानावर सहा तासांपेक्षा जास्त काळ उभे राहणे, ही फार मोठी गोष्ट आहे. यासाठी महिला खेळाडूंचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. विश्रांती घेण्याची इच्छा असूनही खेळाडूंना तसे करणे शक्य होत नाही.”

हेही वाचा – Video: ‘धोनीसह सराव की सचिनसह जेवण?’, मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने क्षणात दिले उत्तर

दरम्यान, महिला फुटबॉलपटूंबाबत २०२१मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, प्रजनन संप्रेरकातील चढउतार हे स्नायू आणि सांध्यावर प्रभाव टाकू शकतात. मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या संप्रेरकांतील बदलांमुळे दुखापत होण्याची शक्यता ८८ टक्क्यांनी वाढते.