काही दिवसापूर्वीच इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी २० संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी २० संघाच्या कर्णधारपदाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता इंग्लंडला मॉर्गनचा वारसदार मिळाला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) जोस बटलरची इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. बटलर एक दशकाहून अधिक काळ इंग्लंडच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाचा सदस्य आहे. २०१५पासून तो उपकर्णधार होता.

३१ वर्षीय जोसने यापूर्वी १४वेळा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी २० अशा दोन्ही प्रकारात इंग्लंडचे नेतृत्व केले आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी नेदरलँड्सविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्याचाही समावेश आहे. त्या सामन्यात मांडीच्या दुखापतीमुळे मॉर्गन खेळला नव्हता. जोस बटलर आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतील १२ सामन्यांत इंग्लंडचे नेतृत्व करेल.

ईसीबीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बटलर म्हणाला, “राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद मिळणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. यापूर्वी जेव्हाही मला असे करण्याची संधी मिळाली तेव्हाही मला फार आनंद झाला होता. मी संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल.”

हेही वाचा – Diamond League 2022 : नीरज चोप्राने मोडला स्वत:चाच विक्रम; रौप्य पदकावर कोरले नाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकदिवसीय आणि टी २० प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांच्या मार्गदर्शनाखाली बटलर, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकावर लक्ष केंद्रित करेल. याशिवाय पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. इंग्लंडमधील पुरुष क्रिकेटचे संचालक रॉब की यांनी कर्णधार पदासाठी बटलरच्या नावाची शिफारस केली होती. बुधवारी संध्याकाळी ईसीबीचे अंतरिम अध्यक्ष मार्टिन डार्लो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्लेअर कॉनर यांनी जोस बटलरच्या नियुक्तीला दुजोरा दिला.