वृत्तसंस्था, पुणे

चौथ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने भारताच्या खेळाडू अदलाबदलीच्या निर्णयावर टीका केली. अष्टपैलू असलेल्या शिवम दुबेला ‘कन्कशन’ (डोक्याला दुखापत) झाल्यानंतर त्याच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला मैदानात उतरण्याची संधी देण्यात आल्याबाबत बटलरने नाराजी व्यक्त केली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर भारताने २० षटकांत ९ बाद १८१ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १९.४ षटकांत १६६ धावांत गारद झाला. त्यामुळे भारताने हा सामना जिंकत पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी मिळवली.

भारताच्या डावातील अखेरच्या षटकात जेमी ओव्हर्टनचा चेंडू शिवम दुबेच्या डोक्याला लागला. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी आला नाही आणि भारताने ‘कन्कशन’च्या नियमाचा वापर करून हर्षित राणाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरवले. हर्षितने तीन गडी बाद करून भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

भारताच्या या बदली खेळाडूच्या वापराविषयी इंग्लंडचा कर्णधार बटलरने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. ‘‘कन्कशनच्या नियमानुसार दुबेऐवजी हर्षित राणा हा पर्याय असू शकत नाही. कन्कशनच्या नियमाचे योग्य पद्धतीने पालन केले गेले नाही,’’ असे बटलरने सांगितले. ‘‘आयसीसीच्या नियमानुसार तुम्ही समान शैलीच्या खेळाडूलाच (लाइक फॉर लाइक) बदली खेळाडू म्हणून मैदानात आणू शकता. दुबे गोलंदाजी करू शकणारा फलंदाज म्हणून संघात होता. त्यामुळे त्याच्या जागी अशाच अष्टपैलू खेळाडूला स्थान मिळणे अपेक्षित होते. भारताचा निर्णय बघता, दुबे एकतर वेगवान गोलंदाज आहे किंवा राणाने त्याला अष्टपैलू म्हणता येईल इतकी फलंदाजीत सुधारणा केली आहे,’’ अशी खोचक टिप्पणीही बटलरने केली.

या संदर्भात भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने ‘‘आम्ही बदली खेळाडूसाठी सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्याकडे हर्षितचे नाव दिले. त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही,’’ असे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ‘कन्कशन’ म्हणून बाराव्या खेळाडूची निवड केली असे भारताने स्पष्टीकरण दिले.

पाचवा सामना आज मुंबईत

भारत आणि इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिकेतील अखेरचा पाचवा सामना आज, रविवारी मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगणार आहे. भारताच्या दृष्टीने हा सामना केवळ औपचारिकता असेल. वानखेडेच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना कायम मदत मिळते. त्यामुळे मोहम्मद शमीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

याआधीही वाद…

ट्वेन्टी-२० सामन्यात ‘कन्कशन’मुळे बदली खेळाडू निवडण्यावरून याआधीही वाद झाला आहे. भारताने यापूर्वी २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यातच रवींद्र जडेजाच्या डोक्याला दुखापत झाल्यावर त्याच्या जागी युजवेंद्र चहलला पसंती दिली होती. त्या सामन्यात चहलची गोलंदाजी निर्णायक ठरली होती. त्यावेळी जडेजा अष्टपैलू असून चहल केवळ गोलंदाज आहे. त्यामुळे भारताने चहलला खेळविण्याची संधी देणे योग्य नसल्याची तक्रार ऑस्ट्रेलियाने केली होती.

● वेळ : सायं. ७ वा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, हॉटस्टार अॅप