मोंचेनग्लॅडबॅच, जर्मनी येथे झालेल्या एफआयएच कनिष्ठ महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करून नवा अध्याय लिहिणाऱ्या भारतीय महिला हॉकीपटूंचे मंगळवारी नवी दिल्लीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
दुबईमार्गे इमिरेट्स एअरलाईन्सच्या विमानाने मंगळवारी सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय महिला हॉकी संघाचे आगमन झाले. भारताने तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत पेनल्टी-शूटआऊटमध्ये इंग्लंडवर ३-२ अशी मात करत कांस्यपदकावर नाव कोरले होते. यापूर्वी भारताला कनिष्ठ विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरीही गाठता आली नव्हती. भारताची कर्णधार सुशिला चानू म्हणाली, ‘‘देशाचे नाव उज्ज्वल केल्याने आम्ही आनंदी आहोत. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात आमच्यावर प्रचंड दडपण होते, पण पदक जिंकण्याची खात्री होती. आम्ही आमच्या कामगिरीवर समाधानी आहोत.’’
राणी रामपालने सहा गोल झळकावत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.
ती म्हणाली, ‘‘कांस्यपदक विजयानंतर भारतात हॉकी खेळ अद्याप जिवंत असल्याचे सिद्ध झाले. हा माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम विजय आहे. ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला संघ कधीच पात्र ठरला नसून या विजयामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. जगातील कोणत्याही संघाला हरवू शकतो, हा आत्मविश्वास आम्हाला या विजयामुळे मिळाला आहे.’’
राणी रामपालमध्ये अफाट गुणवत्ता -बलदेव सिंग
चंडीगढ : ‘‘राणी रामपालमध्ये अफाट गुणवत्ता असून अन्य मुलींच्या तुलनेत अतिशय वेगाने ती हॉकीचे तंत्र आत्मसात करत असते. खिलाडी वृत्ती असलेली राणी प्रदीर्घ काळ भारतीय संघाकडून खेळेल, अशी आशा आहे. भारताच्या विजयात राणीने मोलाची भूमिका बजावली होती. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून भविष्यात चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली आहे,’’ असे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक बलदेव सिंग यांनी सांगितले.