नवी दिल्ली : भारतीय कुस्तीगीर महासंघाविरुद्ध बंड पुकारून एक वर्ष वाया घालावल्याबद्दल बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिकला दोषी धरत आता देशातील सुमारे ३०० हून अधिक कुमार कुस्तीगीर बुधवारी रस्त्यावर उतरले. महासंघावरील बंदी त्वरित उठवावी आणि कुस्तीला जीवदान द्यावे, अशी मागणी करत हे कुस्तीगीर कडाक्याच्या थंडीत तीन तास जंतर मंतरवर ठाण मांडून होते. त्यामुळे कुस्तीच्या अस्तित्वाच्या वादाला आंदोलनाने आता वेगळे वळण मिळाले आहे.

थंडीच्या कडाक्यात सकाळ सरल्यानंतर जंतर मंतरचा परिसर कुस्तीगिरांच्या उपस्थितीने गजबजू लागला होता. उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली येथून भरगच्च भरलेल्या बस पोलिसांचा विरोध न जुमानता जंतर मंतरवर मोकळ्या होत होत्या. भागपत येथील आर्य समाज आखाडा, नरेलाच्या वीरेंद्र कुस्ती अकादमी येथील मल्लांचा यामध्ये सर्वाधिक समावेश होता. हे कुस्तीगीर इतके आक्रमक होते की पोलिसांना त्यांना आवरणे कठीण जात होते. प्रत्येक मल्ल बजरंग, विनेश, साक्षीच्या विरोधात घोषणा देत होते.

तब्बल तीन तास या कुस्तीगिरांचे हे प्रातिनिधिक आंदोलन सुरू होते. सरकारने दहा दिवसांत बंदी उठवली नाही, तर आम्ही आजपर्यंत मिळवलेली पदके परत करू असा इशाराही या आंदोलक कुस्तीगिरांकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पियन कुस्तीगिरांपासूनच देशाच्या कुस्तीला धोका असून, त्यांच्यापासून कुस्ती वाचवा असे थेट आवाहन युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (यूडब्लूडब्लू) संघटनेला करण्यापर्यंत या कुस्तीगिरांची मजल गेली होती.

या आंदोलनात उत्तर प्रदेशातील जवळपास ९० टक्के आखाडा आमच्या बाजूने आहेत. एका बाजूला केवळ तीन कुस्तीगीर आहेत आणि दुसरीकडे लाखो कुस्तीगीर स्पर्धा सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. या तिघांनी देशातील असंख्य कुस्तीगिरांचे नुकसान केले आहे, अशी प्रतिक्रिया मुझप्फरनगर येथील प्रशिक्षक प्रदीप कुमार यांनी व्यक्त केली. या सगळ्या घडामोडीवर बजरंगने थेट प्रतिक्रिया दिली नाही. हा सगळा ब्रिजभूषणचा खोडसाळपणा आहे. आम्ही आंदोलन करत होतो, तेव्हा हे कुठे गेले होते असे बजंरगचे म्हणणे असल्याचे त्याच्या निकटवर्तीयाने सांगितले.

संजय सिंह यांच्याशिवाय कुस्ती महासंघ स्वीकार्ह साक्षी

● भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठवण्यासाठी कुमार कुस्तीगीर रस्त्यावर उतरल्यावर संतप्त झालेल्या साक्षी मलिकने प्रथमदर्शनी ही ब्रिजभूषणची माणसे असल्याची भूमिका व्यक्त केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत आम्हाला निवडून आलेल्या भारतीय कुस्ती महासंघाला विरोध नाही, फक्त महासंघात संजय सिंह नसावेत अशी वेगळी भूमिका घेतली.

● कुस्ती महासंघावर संजय सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्यावर २१ डिसेंबर रोजी साक्षी मलिकने कुस्तीमधून निवृत्ती घेतली होती. त्याचवेळी माझ्या आईला अलीकडेच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या पाठीराख्याकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचीही माहिती साक्षीने पत्रकार परिषदेत दिली.

● ‘‘मला कुस्ती संघटनेत काम करण्यात अजिबात स्वारस्य नाही. पण, तेथे संजय सिंह नकोत. त्यांच्याशिवाय आम्ही कार्यकारिणी मान्य करू. आमचा केवळ या एका व्यक्तीबाबत आक्षेप आहे. त्यांच्याशिवाय कार्यकारिणी होणार असेल, तर आमची हरकत नसेल. हंगामी समितीलाही आमचा विरोध नाही,’’असे साक्षी म्हणाली.

हे प्रातिनिधिक आंदोलन असून, आम्ही बंदी उठवण्यासाठी सरकारला १० दिवसांची मुदत देत आहोत. जर असे झाले नाही, तर आम्हीही बजंरग, विनेशप्रमाणे आमचे अर्जुन पुरस्कार सरकारला परत करू. दोन वर्षे कुमार गटाच्या स्पर्धा झाल्या नाहीत. कुमार खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे. याचा विचार सरकार करणार आहे की नाही. – सुनील राणाअर्जुन पुरस्कार विजेता कुस्तीपटू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहा आठवड्यांत कुमार राष्ट्रीय स्पर्धा

देशातील कुस्ती पुन्हा सुरू करावी यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कुस्तीगिरांना दिलासा देत हंगामी समितीने पुढील सहा आठवड्यांत १५ आणि २० वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. ऑलिम्पिमध्ये सहभाग नोंदवलेल्या मल्लांच्या वर्षभराच्या तीव्र विरोधामुळे कुमार गटाचे आणखी एक वर्ष वाया गेले होते. या विरोधात सकाळीच शेकडो कुस्तीगीर जंतर मंतरवर एकत्र आले होते. तीन तास आंदोलन करून हे कुस्तीगीर त्यांच्या आखाड्यात पोचत नाहीत तो हंगामी समितीने पुढील सहा आठवड्यात कुमार कुस्ती मार्गी लावण्याची घोषणा केली.