भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा हिने तिला पद्म पुरस्कार न मिळाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्वालाने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून याबद्दल भाष्य करताना पद्म पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी विराट कोहली, ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, ज्वाला गट्टा हिने या पुरस्कारासाठी तिसऱ्यांदा अर्ज करूनही तिला हा पुरस्कार मिळाला नाही. यानंतर तिने पद्म पुरस्कारांच्या एकूण प्रक्रियेबद्दलच काही सवाल उपस्थित केले. देशातील मानाच्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या पुरस्कारासाठी अर्ज करावा लागतो, हेच मला काहीसे आश्चर्यकारक वाटते. मात्र, प्रक्रियेचा एक भाग म्हणून मी पुरस्कारासाठी अर्ज केला होता. माझ्या खेळामुळे देशातील लोकांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार असल्याने तो मिळावा, असे मला वाटत होते, अशा शब्दांत ज्वालाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
Expecting to be acknowledged nothing else, it is the 3rd time I applied. I feel I've been let down: Jwala Gutta on Padma Awards pic.twitter.com/i05o6zDalB
— ANI (@ANI) January 26, 2017
Was world no6 in mix doubles & world no10 in women's doubles still didn't get it. It is a little hurtful: Jwala Gutta on Padma Awards pic.twitter.com/VdWq9tTddM
— ANI (@ANI) January 26, 2017
बॅडमिंटनमध्ये दुहेरीतील तज्ज्ञ म्हणून ओळखली जाणाऱ्या ज्वाला गट्टा हिने २०१०च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला दुहेरीत भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले होते. याशिवाय, २०११ साली लंडन येथील जागतिक स्पर्धेत दुहेरीत ज्वालाने कांस्यपदक मिळवले होते. मी देशासाठी तब्बल १५ वर्षे खेळत आहे. याशिवाय, मी अनेक मानाच्या स्पर्धाही जिंकल्या आहेत. त्यामुळे पद्म पुरस्कारासाठी अर्ज करणे मला योग्य वाटले. मात्र, पुरस्कार मिळविण्यासाठी या एवढ्याच गोष्टी पुरेशा नाहीत, असे मला वाटते. तुम्हाला पुरस्कार मिळवायचा असेल तर शिफारशींची गरज लागते. तुमच्यासाठी कुणीतरी शब्द खर्ची घालावा लागतो किंवा कुणाच्या तरी पत्राची गरज लागते. अशाप्रकारे ही यादी वाढतच राहते. मात्र, मुळात पुरस्कार मिळविण्यासाठी अशाप्रकारे अर्ज आणि शिफारश करण्याची गरजच काय आहे? माझे यश पुरेसे नाही का? त्यामुळे मला या संपूर्ण प्रक्रियेबद्दलच एकप्रकारची उत्सुकता आहे. मी कॉमनवेल्थ आणि जागतिक स्पर्धेत मिळवलेली पदके पुरेशी नाहीत का? महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत मी दहाव्या स्थानावर आहे, हे पुरेसे नाही का, असे अनेक सवाल ज्वालाने उपस्थित केले आहेत.