महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. प्रतिष्ठेच्या सरकार्यवाह आणि संयुक्त कार्यवाह पदाच्या पाच जागांचा फैसला रविवारी निवडणुकीद्वारे होणार आहे. आतापर्यंत निकाली लागलेल्या आठही जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या कबड्डी विकास आघाडीने आपली सारी शक्ती पणाला लावली आहे. सरकार्यवाह पदासाठी ठाण्याचे भेंडिगिरी तर संयुक्त कार्यवाह पदासाठी सुनील जाधव (अहमदनगर), प्रकाश बोराडे (नाशिक), मुजफ्फर अली अब्बास अली सय्यद (धुळे), उत्तमराव इंगळे (हिंगोली) आणि मंगल पांडे (परभणी) हे या आघाडीचे उमेदवार आहेत. याचप्रमाणे सरकार्यवाह पदासाठी गणेश शेट्टी (सांगली) तर रवींद्र देसाई (रत्नागिरी) आणि विश्वास मोरे (मुंबई शहर) संयुक्त कार्यवाह पदासाठी अन्य उमेदवार उत्सुक आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे लढणारी ही त्रिमूर्ती कबड्डी विकास आघाडीच्या वर्चस्वाला कसे आव्हान देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीचे आतापर्यंतचे निकाल पाहता पुणे-कोल्हापूरसहित मराठवाडय़ाच्या जिल्ह्यांनिशी अवतरलेल्या ‘कबड्डी विकास आघाडी’ या महायुतीने आपली दमदार आघाडी उघडली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही आघाडी कार्यरत होती. या आघाडीने आखलेल्या योजनाबद्ध रणनीतीचे फळ आता त्यांना मिळत आहे. या साऱ्या राजकारणात सर्वात जास्त फायदा झाला तो पुणे जिल्ह्याचा. बाबुराव चांदेरे आणि शांताराम जाधव हे दोन पुणेकर अनुक्रमे उपाध्यक्ष आणि खजिनदार पदांवर विराजमान झाले. पुणेरी यशाचे आणखी रहस्य म्हणजे चांदेरे आणि जाधव यांनी अखेरच्या टप्प्यात कबड्डी विकास आघाडीला साथ दिली. याचप्रमाणे आमदार किरण पावसकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कृपाशीर्वादामुळे उपाध्यक्षपदावर आले. गतवर्षी याच पावसकर यांनी शिवाजी पार्कवर व्यावसायिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करून दाखवली होती.
राज्य कबड्डीमधील घडामोडींकडे पाहिल्यास मुंबई आणि उपनगर हे महत्त्वाचे जिल्हे. पण कागदोपत्री फक्त विश्वास मोरे हे एकमेव मुंबईचे आव्हान उरलेले आहेत. तथापि, रवींद्र देसाई, गणेश शेट्टी, मीनानाथ धानजी या अन्य जिल्ह्यांचे कागदोपत्री प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटकांचे कार्यक्षेत्रसुद्धा मुंबईच आहे. पण मुंबई आणि उपनगरातील अंतर्गत राजकारणाचा फटका या जिल्ह्यांना बसला. त्यामुळे काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांना आपला उपाध्यक्षपदाचा दावा मागे घ्यावा लागला.
कबड्डी क्षेत्रात अनेक वष्रे कार्यरत असलेले शिवनेरी मंडळाचे विश्वास मोरे सध्या मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाहपद भूषवत आहेत. याचप्रमाणे अखिल भारतीय पंच मंडळाच्या समन्वयक पदावर ते गेली दहा वष्रे कार्यरत आहेत. तसेच कबड्डी क्षेत्रात दबदबा असलेल्या यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र देसाई यांच्याकडे सचिव आणि खजिनदारपदाचा अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी आहे. बुवा साळवी असताना देसाई कार्यकारिणीमध्ये होते. याचप्रमाणे नामनिर्देशन पत्र मागे घेतलेल्या अनेक व्यक्तींमध्ये संघटनाची चांगली बाजू होती. पण खेळासंदर्भातील काही मुद्दे घेऊन रमेश देवाडिकर, किशोर पाटील आणि दत्ता पाथरीकर यांच्या नेतृत्वाखाली जशी कबड्डी विकास आघाडी संघटित झाली, तशी अन्य एखादी आघाडी उदयाला येऊ शकली नाही. मावळते सरकार्यवाह मोहन भावसार यांनीसुद्धा आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. या सर्व मंडळींनी एकत्रितपणे कार्यरत होऊन आपली शक्ती आजमावली असती तर कदाचित वेगळे चित्र कबड्डीमध्ये पाहायला मिळाले असते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2013 रोजी प्रकाशित
कबड्डी विकास आघाडी आणि त्रि-मूर्ती
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. प्रतिष्ठेच्या सरकार्यवाह आणि संयुक्त कार्यवाह पदाच्या पाच जागांचा फैसला रविवारी निवडणुकीद्वारे होणार आहे.
First published on: 27-04-2013 at 03:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi development front and trimurti