‘‘सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधील दैवत मानले जाते. क्रिकेटला ग्लॅमर असल्यामुळे सचिनचा आदर्श मानून अनेक मुले या खेळाकडे वळतात. तसेच ग्लॅमर कबड्डी या मराठी मातीतल्या खेळाला प्राप्त झाले तर कबड्डी हा खेळसुद्धा ऑलिम्पिकपर्यंत पोहोचेल. सचिनप्रमाणे कठोर मेहनत घेणारे अनेक कबड्डीपटू पडद्यामागे आहेत. कबड्डीला लोकप्रिय करण्यासाठी या खेळाला ग्लॅमर मिळणे महत्त्वाचे आहे. तरच करिअर म्हणून अनेक मुले कबड्डी खेळाकडे वळतील,’’ अशा भावना महिला कबड्डी विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील दीपिका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या महाराष्ट्राच्या सुवर्णकन्यांनी व्यक्त केली.
विश्वचषक जिंकल्यानंतर तब्बल १३ महिन्यांनी महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी एक कोटी रुपये देऊन या तिघींचा गौरव करून आश्वासनपूर्ती केली. त्यानंतर सुवर्णा, अभिलाषा आणि दीपिका यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देऊन आपला आतापर्यंतचा प्रवास, कारकीर्द, एक कोटी रुपयांचे इनाम मिळाल्यानंतरची भावना, याविषयी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
‘‘भारतीय महिला संघाने पाटण्यात विश्वचषक जिंकल्यानंतर कबड्डी या खेळाला हळूहळू ग्लॅमर प्राप्त होऊ लागलेय. पण हा खेळ ऑलिम्पिकपर्यंत न्यायचा असल्यास, क्रिकेटप्रमाणे ग्लॅमर कबड्डीला असायला हवे. क्रिकेटइतकीच गर्दी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धाना होत आहे. पण ग्लॅमरच्या अभावामुळे हा खेळ काहीसा मागे पडत आहे. सद्यस्थितीला महिला कबड्डीपटूंना चांगल्या आस्थापनांमध्ये नोकऱ्या उपलब्ध नाहीत. कबड्डीपटूंना नोकऱ्या मिळू लागल्या तरच खेळाडू या खेळाकडे वळतील. कबड्डी या खेळाने मातीतून मॅटवर अशी झेप घेतली आहे. त्यामुळे कबड्डी खेळाची ऑलिम्पिकवारी घडवण्यासाठी या खेळाला ग्लॅमर मिळणे गरजेचे आहे,’’ अशी प्रतिक्रिया सुवर्णा, अभिलाषा आणि दीपिका यांनी व्यक्त केली.
सविस्तर वृत्तान्त रविवारच्या अंकात