भारतीय संघाला एकदिवसीय क्रिकेटने या वर्षांत बरेच काही दिले, पण त्याचबरोबर आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीची जाणीवही करून दिली. भारताने यावर्षी चॅम्पियन्स करंडक जिंकला, त्याचबरोबर झिम्बाब्वेवर त्यांच्यात मातीत ५-० असा पहिल्यांदा ऐतिहासिक विजयाची नोंद भारताने केली. पण असे असले तरी भारताची या वर्षांची सुरुवात आणि शेवटही पराभवानेच झाला. या वर्षांतील पाकिस्तानविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारताला गमवावा लागला, तर दक्षिण आफ्रिकेतील अखेरच्या मालिकेत मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. हे अपवाद सोडल्यास भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलेच वर्चस्व पाहायला मिळाले.
पराभवाने सुरुवात
पाकिस्तान हा भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असला, दोन्ही देशांमध्ये आकस असला तरी या दोघांमधला मैत्रीचा मार्ग हा २२ यार्डमधूनच जातो. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी भारतामध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचे आयोजन केले होते. या वर्षांत ३ जानेवारीला कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर मालिकेतील दुसरा सामना खेळवला गेला आणि भारताच्या पदरी ८५ धावांनी पराभव पडला. या मालिकेतील पहिला सामनाही पाकिस्तानने जिंकल्यामुळे त्यांनी मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. पण यानंतर दिल्लीतील तिसरा सामना भारताने १० धावांनी जिंकत पाकिस्तानला निर्भेळ यश मिळवण्यापासून वंचित केले.
इंग्लंडचा सफाया
कसोटी मालिकेत पराभवाची धूळ चारल्यावर इंग्लंडचा संघ पुन्हा भारतामध्ये एकदिवसीय सामना खेळायला आला होता. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकल्यावर एकदिवसीय मालिकेतही भारत पराभूत होणारा का, ही शंकेची पाल मनात चुकचुकली होतीच. पण भारताने दमदार पुनरागमन करत मालिकेतील दुसरा, तिसरा आणि त्यापाठोपाठ चौथाही सामना जिंकला आणि इंग्लंडचे कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतही भारताला त्यांच्याच मातीत धूळ चारण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
आम्ही चॅम्पियन्स
आतापर्यंत फक्त मायदेशात एकदिवसीय मालिका खेळणारा भारतीय संघ आयपीएल ‘स्पॉट-फिक्सिंग’प्रकरणानंतर इंग्लंडला चॅम्पियन्स करंडक खेळायला गेला. इंग्लंडमधील हवामान, स्विंग आणि वेगवान गोलंदाजीपुढे भारताचा निकाल लागणार का, हा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला होता. पहिल्या साखळी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला २६ धावांनी पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि तिसऱ्या सामन्यात डकवर्थ-लूईस नियमांनुसार पाकिस्तानवर ८ विकेट्सने मात करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत श्रीलंकेवर आठ विकेट्सने विजय मिळवल्यावर अंतिम फेरीत भारताची गाठ यजमान इंग्लंडशी पडणार होती. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना २० षटकांचा करण्यात आला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात अखेर भारताने इंग्लंडवर ५ धावांनी मात करत चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली. शिखर धवनची धडाकेबाज फलंदाजी या स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले, त्यामुळेच या स्पर्धेचा मानकरी धवन ठरला. धवनबरोबरच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचीही बॅट या स्पर्धेत चांगलीच तळपली. गोलंदाजीमध्ये युवा भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी आपली छाप पाडली.
तिरंगीवर तिरंगा
‘चॅम्पियन्स’ ठरल्यावर भारतीय संघ तिरंगी मालिका खेळण्यासाठी थेट वेस्ट इंडिजला रवाना झाला आणि पहिल्या दोन सामन्यांमधील पराभवाने संघाची विजयाची नशा चांगलीच उतरवली. पण हा भारतीय संघ हार मानण्यातला नक्कीच नाही. त्यानंतरचे दोन्ही सामने जिंकत भारताने अंतिम फेरीत स्थान पटकावले. अंतिम फेरीच्या अंतिम षटकात भारताला विजयासाठी १५ धावांची गरज होती आणि कर्णधार धोनीने श्रीलंकेच्या शमिंडा एरंगावर हल्लाबोल करत संघाला विजय मिळवून दिला.
झिम्बाब्वेत ऐतिहासिक विजय
तिरंगी मालिकेनंतर धोनीने विश्रांती घेण्याचे ठरवले आणि विराट कोहलीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. या मालिकेपूर्वी भारताने परदेशात कधीही निर्भेळ यश संपादन केले नव्हते. पण या मालिकेत भारताने झिम्बाब्वेला ५-० अशी धूळ चारत विदेशी धर्तीवर निर्भेळ यश मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियाकडून कडवी झुंज
आपल्या मातीत सर्वच संघांप्रमाणे भारतही ‘शेर’च आहे आणि ऑस्ट्रेलियाचा संघही नवखा असल्याने त्यांची चांगलीच चंपी होणार, असे वाटत होते. पण जॉर्ज बेलीच्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला चांगलीच झुंज दिली. बेलीने स्वत:हून पुढाकार घेत भारतीय गोलंदाजीची पिसे काढत त्यांची मर्यादा स्पष्ट केली होती. पहिल्या तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतरचे दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाल्याने भारताला उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य होते आणि भारताने दोन्ही सामने जिंकत मालिकेवर विजयी झेंडा फडकावला. मालिकेत सातव्या आणि अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने अप्रतिम द्विशतकी खेळी साकारली. ही मालिका पुन्हा एकदा गाजवली ती रोहित आणि विराट कोहली यांनी.
वेस्ट इंडिजवर सहज मात
ऑस्ट्रेलियानंतर वेस्ट इंडिजला सामोरे जाणे भारतासाठी अवघड नक्कीच नव्हते. पण तरीही तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताला २-१ अशी जिंकता आली. वेस्ट इंडिजने दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात बाजी मारली, तर भारताने पहिला व तिसरा सामना जिंकला आणि मालिकाही.
आफ्रिकेत उडाली दैना
दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान खेळपट्टीवर क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या भारताची चांगलीच दैना उडाली. आफ्रिकेचा युवा सलामीवीर क्विंटन डी कॉकने तिन्ही सामन्यांमध्ये शतक झळकावत भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तर भारताच्या फलंदाजांचीही चांगलीच भंबेरी उडाली. पहिल्या सामन्यात १४१ आणि दुसऱ्या सामन्यात १३४ धावांनी आफ्रिकेने भारतावर दणदणीत विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात वरुण राजा भारताला पावला नाहीतर भारताला नाक पुरते कापले गेले असते.