भारतीय संघाचा युवा सलामीवीर केएल राहुल सोशल मीडियावर सक्रिय असला तरी तो चाहत्यांच्या प्रतिक्रियांवर सहसा व्यक्त होत नाही. पण यावेळी पहिल्यांदाच केएल राहुलने आपल्यावर टीका करणाऱया एका ट्विटरकराचे तोंड बंद केले. २४ वर्षीय केएल राहुलच्या पाठिशी ठामपणे उभ्या असलेल्या निवड समितीने वेळोवेळी केएल राहुल भारतीय संघासाठी उत्तम सलामीवीर असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. मात्र, गेल्या काही कसोटी मालिकांचा आढावा घेतला, तर केएल राहुलकडून चांगली कामगिरी पाहायला मिळालेली नाही. केएल राहुल चांगला फलंदाज असला तरी त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून येत नाही, अशी टीका क्रिकेट वर्तुळात त्याच्यावर करण्यात येते. केएल राहुलच्या सध्याच्या निराशजनक कामगिरीवरून त्याला लक्ष्य करणाऱया एका ट्विटरकराला राहुलने जशास तसे प्रत्युत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचा फिरकीपटू आर.अश्विन याने केएल राहुलचे ट्विटर हॅण्डल फॉलो केले आणि याची माहिती केएल राहुलने आपल्या ट्विटर हॅण्डलवर दिली. क्रिकेटचा महानायक आर.अश्विन आपल्याला फॉलो करतोय यापेक्षा दिवसाची चांगली सुरूवात काय असू शकते, अशा आशयाचे ट्विट केएल राहुलने केले. यावर प्रतिक्रिया देताना एका ट्विटरकराने केएल राहुलला त्याच्या निराशाजनक कामगिरीवरून लक्ष्य केले.
‘ते सर्व राहू दे बाजूला..धावा कशा करायच्या यावर लक्ष केंद्रीत कर’, असा खोचक टोला बिईंग चिराग दवे या ट्विटर हॅण्डलवरून लगावण्यात आला. मग केएल राहुलनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले. “प्लीज मित्रा, तूच ये आणि धडे दे आम्हाला. धावा कशा करायच्या याचे गमक तुला नक्कीच ठावूक असेल”, असे ट्विट केएल राहुलने केले. त्याच्या या प्रत्युत्तरावर चाहत्यांनीही पाठिंबा दिला. केएल राहुल देखील टीकाकारांना तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ शकतो, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर क्रिकेटपटू देखील आपल्यासारखेच सामान्य माणसंच असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येत असतात याची जाणीव आपण ठेवायला हवी, असे म्हणत आणखी एका चाहत्याने केएल राहुलला पाठिंबा दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kl rahul lashes back at a fan on twitter
First published on: 28-02-2017 at 13:55 IST