देशभरात सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गंभीर वातावरण निर्माण झालेलं आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. भारतीय संघाचे खेळाडूही सध्याच्या काळात आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने होम क्वारंटाईन काळात आपला दिनक्रम कसा असतो याचा एक व्हिडीओच शेअर केला आहे.
मुंबईतल्या आपल्या घरात अजिंक्य सध्या स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी व्यायाम, कराटे याचा सराव करत असून…याव्यतिरीक्त वाचन, आपल्या लहानग्या मुलीशी खेळणं, बायकोला स्वयंपाकात मदत अशी कामं करतो आहे. आपल्या सर्व चाहत्यांना अजिंक्यने या काळात घरातच थांबण्याची विनंती केली आहे.
न्यूझीलंडचा दौरा आटोपून अजिंक्य भारतात परतला होता. या दौऱ्यात त्याला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आयपीएलमध्ये अजिंक्य यंदा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार होता…पण करोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा होईल की नाही याबद्दलही साशंकता आहे.
अवश्य वाचा – बाबांनी विचारलं घराच्या बाहेर पडायचं? आर्या म्हणाली नाही ! पाहा, रहाणेच्या मुलीचा गोंडस व्हिडीओ