किंग्ज इलेव्हन पंजाबने यंदाच्या आयपीएल हंगामात कात टाकली आहे. त्यामुळे त्यांच्याशी सामना करणे आव्हानात्मकच सिद्ध झाले आहे. गुरुवारी दोन वेळा आयपीएल विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सची त्यांच्याविरुद्ध कसोटी लागणार आहे.
‘कोलबो, लोरबो, जीतबो रे..’चा पुकार करणाऱ्या कोलकात्याने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे आयपीएलच्या व्यासपीठावरील एक बलवान संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अगदी पंजाबविरुद्धच्या त्यांच्या कामगिरीचा आढावा जरी घेतला तरी कोलकात्याचे १३-६ असे पारडे जड दिसते आहे; परंतु आठवडय़ाभरातील कामगिरीचा आढावा घेतल्यास चित्र पंजाबसाठी अनुकूल आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ख्रिस लिन दुखापतग्रस्त असल्यामुळे कोलकात्याची स्थिती तर आणखी बिकट झाली आहे.
आयपीएलमध्ये यंदा ऑस्ट्रेलियन फलंदाज लिनने छाप पाडली आहे. पहिल्याच सामन्यात त्याने ४१ चेंडूंत धुवाधार नाबाद ९३ धावांची खेळी साकारली आणि गौतम गंभीरसोबत १८४ धावांची विक्रमी सलामी नोंदवली होती. मात्र मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. तो सामना कोलकात्याने चार विकेट्स राखून गमावला होता.
पंजाबविरुद्ध एकीकडे लिनबाबत साशंका असताना भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव खेळण्याची शक्यता बळावल्यामुळे कोलकात्यासाठी तो आशेचा किरण ठरू शकेल. उमेश दुखापतीमुळे कोलकात्याकडून दोन्ही सामन्यांत खेळू शकला नव्हता. त्याने घरच्या हंगामातील १३ पैकी १२ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. भारतासारख्या फिरकीला अनुकूल वातावरणात त्याने बळींच्या आकडेवारीत हंगामाअखेरीस रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यापाठोपाठ तिसरा क्रमांक लावला आहे. यादव अंकित रजपूतऐवजी संघात स्थान मिळवू शकेल. मुंबईविरुद्धच्या अखेरच्या षटकात रजपूतने १९ धावा दिल्या होत्या. कोलकात्याचे १७८ धावांचे आव्हान मुंबईने एक चेंडू राखून पेलले होते. याशिवाय ट्रेंट बोल्ट किंवा ख्रिस वोक्स यांच्याऐवजी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनाचा संघात समावेश होऊ शकेल.
लिनच्या अनुपस्थितीत रॉबिन उथप्पाचे सलामीचे स्थान निश्चित मानले जात आहे. याशिवाय मनीष पांडेवर त्यांच्या फलंदाजीची मदार असेल. त्याने मुंबईविरुद्ध ४७ चेंडूंत ८१ धावा केल्या होत्या.
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या आतापर्यंतच्या कामगिरीतील सर्वोत्तम क्षण म्हणजे २०१४ मध्ये गाठलेली अंतिम फेरी. यंदा वीरेंद्र सेहवागच्या मार्गदर्शनाखाली जणू पंजाबच्या संघाला पालवी फुटली आहे. त्यामुळे रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यासारख्या संघांना पंजाबने हरवण्याची किमया साधली आहे. त्याचे सर्वच निर्णय संघासाठी फलदायी ठरत आहेत.
सर्वप्रथम सेहवागने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. रांचीत भारताविरुद्ध शतक झळकावणाऱ्या मॅक्सवेलला ईऑन मॉर्गन आणि डॅरेन सॅमीपेक्षा प्राधान्यक्रम सेहवागने दिला. पुण्याविरुद्ध सहा विकेट्स राखून मिळवलेल्या विजयात मॅक्सवेलने नाबाद ४४ धावा केल्या होत्या, तर बंगळुरूविरुद्ध आठ विकेट्सने मिळवलेल्या विजयात त्याने २२ चेंडूंत नाबाद ४३ धावा केल्या होत्या.
याचप्रमाणे सेहवागने अखेरच्या मिनिटाला वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा संघात समावेश केला. त्यामुळे कोलकात्यासाठी शेवटच्या षटकांमध्ये इशांत आव्हानात्मक ठरू शकेल. पंजाबचा यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला घरच्या मैदानावर आपले कौशल्य दाखवण्याची ही नामी संधी असेल.
प्रतिस्पर्धी संघ
कंग्ज इलेव्हन पंजाब : ग्लेन मॅक्सवेल ( कर्णधार), वरुण आरोन, अनुरीत सिंग, अरमान जाफर, केसी करिअप्पा, गुरकीरत सिंग मान, निखिल नाईक, टी.नटराजन, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा, प्रदीप साहू, संदीप शर्मा, मोहित शर्मा, रिंकू सिंग, स्वप्निल सिंग, राहुल टेवाटिया, शार्दूल ठाकूर, मनन व्होरा, हशीम अमला, मार्टिन गप्तील, मॉट हेन्री, शॉन मार्श, डेव्हिड मिलर, इऑन मॉर्गन, डॅरेन सॅमी, मार्कस स्टोइनिस.
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), पीयुष चावला, ऋषी धवन, सयान घोष, शेल्डॉन जॅक्सन, इशांक जग्गी, कुलदीप यादव, मनीष पांडे, युसुफ पठाण, सूर्यकुमार यादव, अंकित राजपूत, संजय यादव, रॉबिन उथप्पा, उमेश यादव, ख्रिस वोक्स, शकीब अल हसन, रोव्हमन पॉवेल, सुनील नरिन, नॅथन कोल्टिअर नील, ट्रेंट बोल्ट.
- सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.
- थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी मॅक्स.