अ‍ॅलेक्सी सांचेझने झळकावलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर बार्सिलोनाने एल्चे संघावर ४-० असा सहज विजय मिळवला. या विजयामुळे बार्सिलोनाने गोलफरकाच्या आधारावर स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. बार्सिलोना आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद यांचे प्रत्येकी ४९ गुण झाले असून पुढील आठवडय़ात हे दोन्ही संघ या मोसमात प्रथमच आमने-सामने असणार आहेत.
मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे अव्वल खेळाडू लिओनेल मेस्सी या सामन्यातही खेळू शकला नाही. मेस्सी आणि नेयमार यांना हा सामना बाहेर बसूनच पाहावा लागला. नाताळाच्या सुट्टीवरून परतलेल्या नेयमारला या सामन्यासाठी संधी देण्यात आली नाही. सांचेझ आणि प्रेडो रॉड्रिगेझ यांनी आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. सांचेझने सातव्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलल्यानंतर रॉड्रिगेझने १६व्या मिनिटाला बार्सिलोनाची आघाडी २-० अशी वाढवली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला झावी हेर्नाडेझ याने पेनल्टीवर गोल करण्याची संधी वाया घालवली.
पण सांचेझने प्रेडोच्या पासवर ६३व्या मिनिटाला आणखी एक गोलाची भर घालत बार्सिलोनाला सामन्यावरील पकड घट्ट करून दिली. ६९व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकवर चिलीच्या सांचेझने गोल करत हॅट्ट्रिक साजरी केली. रिअल माद्रिदने सेल्टा व्हिगो संघावर विजय मिळवल्यास अव्वल स्थानावरील बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यात फक्त पाच गुणांचा फरक असेल.
‘‘आमच्या खेळात विविधता होती. गोल करण्याच्या अनेक संधी आम्ही निर्माण केल्या. अ‍ॅलेक्सी सांचेझ फॉर्मात आल्याने मी आनंदी आहे,’’ असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांनी सांगितले. अन्य सामन्यांत, रिअल सोसिएदादने अ‍ॅथलेटिक बिलबाओचा २-० असा पराभव करत या स्पर्धेतील सलग पाचव्या विजयाची नोंद केली. फ्रान्सच्या अँटोनी ग्रिझमानने रिअल सोसिएदादसाठी पहिला गोल केला. त्याचा हा या मोसमातील १४वा गोल ठरला. त्यानंतर रुबेन पाडरेने दुसरा गोल करत सोसिएदादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अ‍ॅटलेटिको माद्रिदने मलगा संघाचा १-० असा पराभव केला. कोके याने निर्णायक गोल करत अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.