La Liga Football match माद्रिद : करीम बेन्झिमाने सात मिनिटांच्या आत झळकावलेल्या तीन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लिगा फुटबॉलमध्ये व्हॅलाडोलिड संघावर ६-० असा मोठय़ा फरकाने विजय मिळवला. या विजयामुळे ‘कोपा डेल रे’च्या उपांत्य सामन्यात बार्सिलोनाचा सामना करण्यापूर्वी संघाचा आत्मविश्वास दुणावेल. माद्रिद उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्याकरता बार्सिलोनाला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सामन्यात बार्सिलोनाने माद्रिदला १-० असे नमवले होते.
सामन्याच्या सुरुवातीपासून रेयाल माद्रिदने आक्रमक खेळ करताना व्हॅलाडोलिडला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही. सामन्याच्या २२व्या मिनिटाला रॉड्रिगोने संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर बेन्झिमाने (२९व्या मि., ३२व्या मि.व ३६व्या मि.) हॅट्ट्रिकची नोंद करताना व्हॅलाडोलिडच्या बचावफळीवर दडपण आणले. मध्यांतरापर्यंत माद्रिदकडे ४-० अशी भक्कम आघाडी होती. दुसऱ्या सत्रात, मार्को असेनिसोओने (७३व्या मि.) आणखी एका गोलची भर घालत आघाडी वाढवली. तर, भरपाई वेळेत लुकास वाझकेझने गोल करत संघाच्या खात्यात सहाव्या गोलचा भरणा केला.