अतिशय तांत्रिक वाटणाऱ्या नियमाचा फटका बांगलादेश संघाला बसला. टी२० वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर होता. मात्र दक्षिण आफ्रिकेने टिच्चून खेळ करत अवघ्या ४ धावांनी बाजी मारली. या पराभवाचं शल्य बांगलादेशला प्रदीर्घ काळ टोचत राहील कारण एका तांत्रिक नियमामुळे त्यांना ४ धावा मिळाल्या नाहीत आणि तेवढ्याच फरकाने त्यांचा पराभव झाला.

न्यूयॉर्कच्या अतिशय आव्हानात्मक खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात तान्झिम सकीबने रीझा हेन्ड्रिक्सला माघारी धाडलं. तो भोपळाही फोडू शकला नाही. तिसऱ्या षटकात तान्झिमनेच क्विंटनला त्रिफळाचीत केलं. पुढच्या षटकात तास्किन अहमदने आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमला तंबूचा रस्ता दाखवला. पाठोपाठ युवा ट्रिस्टन स्टब्सही भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला. दक्षिण आफ्रिकेची स्थिती २३/४ अशी झाली. यानंतर डेव्हिड मिलर आणि हेनरिच क्लासन यांनी पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांनी एकेरी-दुहेरी धावांचा रतीब घालतानाच चौकार-षटकारही लगावले. या भागीदारीमुळेच आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. तास्किनने क्लासनला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पुढच्याच षटकात डेव्हिड मिलर रिषाद हुसेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला ११३ धावांचीच मजल मारता आली. बांगलादेशकडून तान्झिमने ३ तर तास्किनने २ विकेट्स पटकावल्या.

या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना तांझिड हसनने दोन चौकारांसह आक्रमक सुरुवात केली पण कागिसो रबाडाने त्याला बाद केलं. कर्णधार शंटो आणि लिट्टन दास डाव सावरला. केशव महाराजने लिट्टनला मिलरकडे झेल देण्यास भाग पाडलं. प्रचंड अनुभवी शकीब अल हसनकडून बांगलादेशला मोठ्या अपेक्षा होत्या. पण अवघ्या ३ धावा करुन शकीब माघारी परतला. अँनरिक नॉर्कियाने त्याला बाद केलं. नॉर्कियानेच शंटोलाही बाद केलं. यानंतर महमदुल्ला आणि तौहिद हृदॉय यांनी पाचव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. तौहिदला रबाडाने पायचीत केलं. त्याने ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. महमदुल्ला हा बांगलादेशचा आशास्थान होता. १६व्या षटकानंतर बांगलादेशला २४ चेंडूत २७ धावांची आवश्यकता होती. सामन्याचं पारडं बांगलादेशच्या बाजूने होतं. पहिल्या चेंडूवर हृदॉयने एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर जे घडलं त्याने बांगलादेशच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं.

१६.२ चेंडूवर नेमकं झालं काय?

ओटेनिल बार्टमनने टाकलेला दुसरा चेंडू महमदुल्लाने तटवून काढला. लेगस्टंपच्या दिशेने पडलेला हा चेंडू वेगाने सीमारेषेपल्याड गेला. महमदुल्लाने अक्रॉस जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पॅडला लागून वेगाने बाऊंड्रीच्या दिशेने गेला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी अपील केलं. ऑस्ट्रेलियाचे पंच सॅम नोगाज्सकी यांनी आफ्रिकेच्या बाजूने कौल देत बादचा निर्णय दिला. महमदुल्लाने त्वरित रिव्ह्यू घेतला. रिप्लेत चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जात असल्याचं स्पष्ट झालं. पंचांनी त्यांचा निर्णय बदलला. महमदुल्लाला जीवदान मिळालं पण धावा मिळाल्या नाहीत. चेंडू पॅडला लागून सीमारेषेपल्याड गेला खरा पण पंचांनी बादचा निर्णय दिल्याने चेंडू डेड झाला. त्यामुळे बांगलादेशला लेगबाईजच्या चार धावा मिळू शकल्या नाहीत. या चार धावाच बांगलादेशच्या पराभवाचं कारण ठरल्या अशा भावना बांगलादेशच्या चाहत्यांनी व्यक्त केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समालोचक आणि माजी खेळाडू अंबाती रायुडू यांनी हे अतिशय खराब पंचगिरी असल्याचं म्हटलं आहे. ‘चेंडू कोणत्याही स्थितीत स्टंप्सचा वेध घेणं शक्य नव्हतं. बाद देण्याचा निर्णय अगम्य होता. या निर्णयामुळे बांगलादेशला हक्काच्या ४ धावा लेगबाईजच्या रुपात मिळू शकल्या नाहीत’, असं रायुडू यांनी म्हटलं आहे.