मुंबई : गतशतकाच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये क्रिकेटपटूंइतकीच लोकप्रियता लाभलेले विख्यात पंच हेरॉल्ड ‘डिकी’ बर्ड यांचे निधन झाल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. डिकी बर्ड यांनी वयाच्या ९२व्या वर्षी शांतपणे जगाचा निरोप घेतला, असे त्यांच्या यॉर्कशायर क्रिकेट क्लबने एका निवेदनात नमूद केले.
रोखलेले डोळे आणि कपाळावर आठ्या ही त्यांची छबी जितकी परिचित, तितकेच बारीक मिश्कील डोळे नि ओठांमध्ये दाबलेले हसू हे रूपही सुपरिचित. डिकी बर्ड हे मूळचे इंग्लंडमधील प्रथमश्रेणी क्रिकेटपटू. पण गुडघेदुखीमुळे तेथे निभाव लागला नाही, तेव्हा स्थानिक क्रिकेटमध्ये पंच म्हणून उभे राहू लागले.
१९७३ ते १९९६ अशा प्रदीर्घ कारकीर्दीत डिकी बर्ड यांनी ६६ कसोटी सामने आणि ६९ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले. यात १९७५, १९७९ आणि १९८३ मधील विश्वचषक अंतिम सामन्यांचा समावेश आहे. १९७९ मधील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचगिरी करणार का, असे त्यांना विचारण्यात आले. कारण अंतिम सामना वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार होता नि बर्डही इंग्लंडचेच. त्यावर ‘इंग्लंड खेळत असेल तरी मला कधी फरक पडला का’ अशी विचारणा त्यांनी केली होती.
क्रिकेटमध्ये बराच काळ इंग्लिश पंचांचा दबदबा होता. कारण निःपक्षपाती, कर्तव्यकठोर आणि सर्व नियमांचे जाणकार ही गुणत्रयी त्यांच्या ठायी नेहमीच दिसून यायची. त्या परंपरेला डिकी बर्ड यांनी वेगळ्या उंचीवर नेले. ज्या काळात ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज आग ओकत होते नि भारताचे फिरकीपटू आपल्या करामतीचे गारूड फलंदाजांवर करत होते, अशा आव्हानात्मक काळात डिकी बर्ड खंबीरपणे उभे राहिले.
मैदानावर त्यांचा दबदबा होता, पण खेळाडूंच्या मिश्कील कुरापतींना ते दाद आणि प्रतिसादही द्यायचे. सहसा फलंदाजांना पायचीत न देणारे असा त्यांचा लौकिक होता. त्याविषयी चर्चा झालीच तर ‘खात्री पटल्याशिवाय बाद देऊ नये’ या नियमाकडे ते बोट दाखवत! १९९६मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स मैदानावर झालेला सामना त्यांचा शेवटचा सामना होता. त्यावेळी दोन्ही संघांतील खेळाडूंनी त्यांना मानवंदना दिली, त्यावेळी कर्तव्यकठोर म्हणून ओळखले जाणारे बर्ड भावनाविवशही झाले.