कोची : लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाचा पुढील महिन्यात केरळ येथे नियोजित मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना लांबणीवर गेला आहे. या सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची (फिफा) अद्याप मान्यता मिळालेली नाही, असे केरळचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहिमान यांनी सांगितले.
केरळमधील क्रीडा मंत्रालय आणि प्रायोजक अँटो ऑगस्टीन यांनी मिळून अर्जेंटिना संघ १७ नोव्हेंबर रोजी कोची येथे एक मैत्रीपूर्ण सामना खेळेल, असे आधी जाहीर केले होते. मात्र, पुढील महिन्यात हा सामना होऊ शकणार नसल्याचे आता ऑगस्टीन यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शनिवारी ही माहिती दिली.
‘‘फिफाची परवानगी मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेता, अर्जेंटिना फुटबॉल संघटनेशी चर्चा केल्यानंतर नोव्हेंबरचा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे ऑगस्टीन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले. केरळमधील सामना पुढील आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी राखीव असणाऱ्या वेळेत घेण्यात येईल आणि नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही ऑगस्टीन यांनी नमूद केले.
‘‘अर्जेंटिनाचा केरळ दौरा फिफाच्या मान्यतेवर अवलंबून आहे. अर्जेंटिनाचे नोव्हेंबरमध्ये दोन सामने नियोजित होते. यातील एक सामना अँगोलामध्ये आणि एक सामना केरळमध्ये खेळवला जाणार होता. अँगोलामधील सामना होणार आहे. परंतु केरळमधील सामन्याबाबत फिफाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि आशियाई फुटबॉल महासंघाची शिफारस, तसेच आम्ही ‘फिफा’च्या उपाध्यक्षांना भेटूनही या सामन्यासाठी अजून मंजुरी मिळालेली नाही,’’ असे केरळचे क्रीडामंत्री व्ही अब्दुरहिमान यांनी सांगितले. तसेच ‘फिफा’ने त्वरित मंजुरी दिल्यास अजूनही ठरलेल्या दिवशी सामना होऊ शकेल असा आशावादही अब्दुरहिमान यांनी व्यक्त केला.
केरळच्या फुटबाॅल चाहत्यांच्या पदरी निराशा
‘फिफा’कडून परवानगी न मिळाल्याने मेसीसह अर्जेंटिना संघाचा सामना पुढे ढकलण्यात आला. यामुळे मेसीची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या केरळच्या फुटबाॅल चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
