कोलकाता : फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक अशी ख्याती असलेल्या लिओनेल मेसीच्या भारत दौऱ्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. फुटबॉलप्रेमी भारतात परतण्यास मी उत्सुक असून माझ्यासाठी ही मोठी सन्मानाची गोष्ट असल्याची भावना मेसीने गुरुवारी व्यक्त केली.

मेसी याआधी २०११ मध्ये भारतात मैत्रीपूर्ण सामना खेळला होता. आता तो डिसेंबरमध्ये  स्वतंत्रपणे भारताच्या दौऱ्यावर येणे नियोजित आहे. ‘गोट टूर ऑफ इंडिया २०२५’ अंतर्गत तो चार शहरांना भेट देणार आहे. ‘‘भारताचा दौरा करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी १४ वर्षांपूर्वी भारतात खेळलो होतो, तेव्हा चाहत्यांचा मला भरघोस पाठिंबा आणि प्रेम लाभले होते.

भारत फुटबॉलप्रेमी देश आहे आणि हा सुंदर खेळ नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी, तसेच या चाहत्यांना भेटण्यासाठी मी खूप उत्सुक आहे,’’ असे मेसीने नमूद केले. ‘गोट टूर ऑफ इंडिया २०२५’च्या आयोजकांनी मेसीच्या दौऱ्याबाबत १५ ऑगस्ट रोजी माहिती दिली होती. आता मेसीने स्वत: चाहत्यांना संदेश देत या दौऱ्याची पुष्टी केली आहे.

या दौऱ्याला कोलकातापासून (१२ डिसेंबर) सुरुवात होईल. त्यानंतर तो अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरांना भेट देईल. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. १५ डिसेंबर रोजी मेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे नियोजित असून त्यानंतर त्याच्या या दौऱ्याची सांगता होईल. कोलकाता येथील ‘गोट कॉन्सर्ट’ आणि ‘गोट चषक’ लढत १३ डिसेंबरला सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार असल्याचेही आयोजकांनी गुरुवारी सांगितले. या प्रदर्शनीय लढतीत मेसीसह सौरव गांगुली, बायचुंग भुतिया आणि लिअँडर पेस असे नामांकित भारतीय माजी खेळाडू खेळणार आहेत.