Messi’s India Tour Features Cricket Crossover: भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान आपण क्रिकेट व फुटबॉलचा महासंगम पाहिला. भारताचा क्रिकेट संघ मँचेस्टर कसोटीपूर्वी मँचेस्टर युनायटेड फुटबॉल संघाची भेट घेण्यासाठी गेला होता. दरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंनी खास एकमेकांच्या जर्सी घातल्या होत्या आणि फुटबॉल-क्रिकेट खेळताना दिसत होते. आता फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू असलेला लिओनेल मेस्सी वानखेडे स्टेडियममध्ये दिग्गज भारतीय खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
लिओनेल मेस्सी डिसेंबर २०२५मध्ये भारतामध्ये येणार आहे. यादरम्यान तो वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचणार आहे. जिथे तो फुटबॉल नाही तर क्रिकेट खेळताना दिसण्याची शक्यता आहे, असं रिपोर्ट्समध्ये समोर आलं आहे. मेस्सी सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंसह सामने खेळू शकतो.
वानखेडेच्या मैदानावर गुंजणार मेस्सीचं नाव
मेस्सी निश्चित भारतात येणार की नाही, अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत विधान समोर आलेलं नाही. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, १४ डिसेंबरला लिओनेल मेस्सी वानखेडे मैदानावर खेळताना दिसणार आहे. जर सर्व काही नियोजनानुसार झालं तर मेस्सी सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्याबरोबर क्रिकेट सामना खेळतानाही दिसू शकतो.
एका इव्हेंट एजन्सीने मुंबई क्रिकेट असोसिएशनला १४ डिसेंबर रोजी, ज्या दिवशी मेस्सी भारत दौऱ्यावर येणार आहे, त्या दिवशी मैदान बंद ठेवण्याची विनंती केली आहे. एमसीएच्या एका सूत्राने सांगितले की, “मेस्सी १४ डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमला भेट देणार आहे. तो माजी आणि सध्याच्या खेळाडूंसह क्रिकेट सामने देखील खेळू शकतो. संपूर्ण वेळापत्रक तयार केल्यानंतर आयोजक याबद्दल माहिती देतील.”
१४ वर्षांनी मेस्सी भारत दौऱ्यावर येणार
लिओनेल मेस्सी १३ ते १५ डिसेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर असू शकतो. मुंबई व्यतिरिक्त, मेस्सी यादरम्यान दिल्ली आणि कोलकातालाही भेट देऊ शकतो. हा स्टार फुटबॉलपटू १४ वर्षांनी भारतात येणार आहे. यापूर्वी, तो २०११ मध्ये सामना खेळण्यासाठी भारतात आला होता.
यापूर्वी असं वृत्त होतं की मेस्सी संपूर्ण अर्जेंटिना राष्ट्रीय संघासह ऑक्टोबरमध्ये भारतात येऊ शकतो. पण सध्या हा प्लॅन स्थगित करण्यात आला आहे. ३८ वर्षीय मेस्सी सध्या इंटर मियामी क्लबकडून खेळत आहे. मेस्सी पुढील वर्षी त्याचा शेवटचा फिफा विश्वचषक खेळताना दिसेल. २०२२ मध्ये त्याने त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला चॅम्पियन बनवले.