पीटीआय, कोलकाता
विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाचा केरळ दौरा रद्द झाल्यामुळे लिओनेल मेसीला खेळताना पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहणार असल्याने निराश झालेल्या भारतीय फुटबॉलप्रेमींना आता दिलासा मिळाला आहे. स्पर्धात्मक सामना खेळण्यासाठी नसला, तरी मेसी वर्षाअखेरीस भारताच्या दौऱ्यावर येणार असून मुंबईसह चार शहरांना भेट देणार आहे. मेसीच्या या दौऱ्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आयोजक सताद्रु दत्ता यांनी दिली.
‘फुटबॉलवेडे शहर’ अशी ख्याती असलेल्या कोलकातापासून (१२ डिसेंबर) या दौऱ्याला सुरुवात होईल. अनेकांच्या मते, मेसी सर्वकालीन सर्वोत्कृष्ट अर्थात ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ (गोट) फुटबॉलपटू आहे. त्यामुळेच मेसीच्या या दौऱ्याला ‘गोट टूर ऑफ इंडिया २०२५’ असे नाव देण्यात आले आहे. कोलकातानंतर अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरांनाही मेसी भेट देईल. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. १५ डिसेंबर रोजी मेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे नियोजित असून त्यानंतर त्याच्या या दौऱ्याची सांगता होईल.
मेसी २०११ सालानंतर प्रथमच भारतात येणार आहे. त्या वेळी मेसीचा समावेश असलेल्या अर्जेंटिना संघाने व्हेनेझुएला संघाविरुद्ध कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर मैत्रीपूर्ण सामना खेळला होता. यंदा मेसीसह त्याचे इंटर मियामी क्लबमधील सहकारी रॉड्रिगो डी पॉल, लुइस सुआरेझ, जॉर्डी अल्बा आणि सर्जिओ बुसकेस्ट्स हेसुद्धा भारतात येऊ शकतील अशी चर्चा आहे.
मेसी १२ डिसेंबरला कोलकाता येथे दाखल होईल. तो या शहरात दोन दिवस राहील. या वेळी तो चाहत्यांना भेटेल, तसेच त्याच्यासाठी विशेष खाद्यपदार्थ आणि चहा तयार केला जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. कोलकातामध्ये मेसीच्या पुतळ्याचेही अनावरण केले जाणार आहे. त्यानंतर ‘गोट कॉन्सर्ट’ आणि ‘गोट चषक’ होणार आहे. मात्र, ते इडन गार्डन्स आणि सॉल्ट लेक स्टेडियमपैकी नक्की कुठे आयोजित केले जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. ‘गोट चषक’ लढतीत मेसी दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुली, माजी टेनिसपटू लिअँडर पेस, अभिनेता जॉन अब्राहम आणि भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया यांच्यासह सातसदस्यीय फुटबॉल सामना खेळणार आहे. त्यानंतर तो अन्य शहरांना भेट देण्यासाठी रवाना होईल.
दौऱ्याचा कार्यक्रम
– मेसीच्या भारत दाैऱ्याची सुरुवात १२ डिसेंबरला कोलकातापासून होईल. मग १३ डिसेंबरला सायंकाळी मेसी अहमदाबाद गाठेल. या वेळी अदानी फाऊंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
– मेसी १४ डिसेंबरला मुंबईत येणार आहे. सर्व प्रथम ‘सीसीआय’ ब्रेबॉर्न स्टेडियमवर तो चाहत्यांना भेटेल. त्यानंतर वानखेडेवर ‘गोट कॉन्सर्ट’ आणि ‘गोट चषक’ लढत होणार आहे.
– मेसी ‘पॅडल’ खेळांचा चाहता मानला जातो. त्यामुळे तो ब्रेबॉर्नवर काही मिनिटे शाहरुख खान आणि लिअँडर पेस यांच्यासह एखादा ‘पॅडल’ खेळ खेळणे अपेक्षित आहे.
– ‘गोट चळवळी’च्या आयोजनाबाबतही चर्चा असून यात मेसीसह सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा हे आजी-माजी क्रिकेटपटू, तसेच अभिनेते रणवीर सिंग, आमीर खान आणि टायगर श्रॉफ सहभाग नोंदवू शकतील.
– त्यानंतर १५ डिसेंबरला मेसी दिल्लीत दाखल होईल. इथेही फिरोझ शाह कोटला स्टेडियमवर ‘गोट कॉन्सर्ट’ आणि ‘गोट चषक’ लढत होणार आहे. यात विराट कोहली आणि शुभमन गिल सहभाग नोंदविण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल.