लंडन : अर्जेटिनाचा तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसी कारकीर्दीत आठव्यांदा ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. यात मेसीने नॉर्वे आणि मँचेस्टर सिटीचा आघाडीपटू अर्लिग हालँडला मागे टाकले. महिलांमध्ये स्पेनची खेळाडू ऐताना बोनामती या पुरस्काराची मानकरी ठरली.

‘फिफा’ वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी पुरुष विभागात मेसी आणि हालँड यांच्यात चुरस पाहायला मिळाली. जगभरातील राष्ट्रीय संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक, निवडक पत्रकार व चाहत्यांच्या मतांनंतर मेसी आणि हालँड यांचे समान ४८ गुण होते. त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. पहिल्या स्थानासाठी मेसीला १०७ मते, तर हालँडला ६४ मते मिळाली होती. त्यामुळे मेसी या पुरस्काराचा मानकरी ठरला. फ्रान्स आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा आघाडीपटू किलियन एम्बापे तिसऱ्या स्थानी राहिले. लंडन येथे झालेल्या पुरस्कार सोहळयासाठी हे तिघेही उपस्थित नव्हते.

हेही वाचा >>> रोहितला सूर गवसणार ? भारत-अफगाणिस्तान तिसरा ट्वेन्टी-२० सामना आज

चाहत्यांची सर्वाधिक मते ही मेसीला मिळाली, तर पत्रकारांनी हालँडला अधिक मते दिली. तसेच राष्ट्रीय संघाच्या कर्णधारांनी मेसी आणि प्रशिक्षकांनी हालँडला अधिक मते दिली. या पुरस्कारासाठी १३ महिन्यांपूर्वी कतार येथे झालेली विश्वचषकातील कामगिरी ग्राह्य धरली गेली नाही. विश्वचषकानंतर म्हणजेच १८ डिसेंबर २०२२ ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीतील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करण्यात आला.

मेसी आणि एम्बापे यांनी पॅरिस सेंट-जर्मेनला लीग-१चे जेतेपद मिळवून दिले. मात्र, या संघाने चॅम्पियन्स लीगमध्ये निराशा केली. विश्वचषकानंतर मेसीने पॅरिससाठी २२ सामन्यांत नऊ गोल आणि सहा गोलसाहाय्य केले. गतहंगामानंतर मेसीने अमेरिकेतील इंटर मियामी संघाशी करार केला.

दुसरीकडे, हालँडने मँचेस्टर सिटीचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली. त्याने विश्वचषकानंतर ३६ सामन्यांत २८ गोल नोंदवले. त्याच्या कामगिरीच्या जोरावर मँचेस्टर सिटीने २०२२-२३च्या हंगामात चॅम्पियन्स लीग, प्रीमियर लीग आणि एफए चषक या स्पर्धा जिंकल्या. मात्र, हालँडला बॅलन डी’ओर पाठोपाठ ‘फिफा’च्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारातही दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वोत्तम संघात सिटीचे ११ खेळाडू

‘फिफप्रो वल्र्ड ११’ म्हणजेच वर्षांतील सर्वोत्तम संघात सिटीचे सहा खेळाडू होते. यात रुबेन डियाझ, जॉन स्टोन्स, काएल वॉकर (सर्व बचावपटू), केव्हिन डीब्रूएने, बर्नाडरे सिल्वा (दोघे मध्यरक्षक) आणि अर्लिग हालँड (आघाडीपटू) यांचा समावेश होता. यासह थिबो कोर्टवा (गोलरक्षक, रेयाल माद्रिद), जुड बेिलगहॅम (मध्यरक्षक, रेयाल माद्रिद/बुरुसिया डॉर्टमंड), किलियन एम्बापे (आघाडीपटू, पॅरिस सेंट-जर्मेन), लिओनेल मेसी (आघाडीपटू, पॅरिस सेंट-जर्मेन/इंटर मियामी) आणि व्हिनिशियस (आघाडीपटू, रेयाल माद्रिद) यांनाही या संघात स्थान मिळाले.

पेप गॉर्डियोला सर्वोत्तम प्रशिक्षक

मँचेस्टर सिटीचे पेप गॉर्डियोला ‘फिफा’च्या सर्वोत्तम प्रशिक्षकाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांना २०११ सालानंतर प्रथमच हा पुरस्कार मिळाला. महिलांमध्ये इंग्लंडच्या सरिना विगमन यांनी पुरस्कार पटकावला. मँचेस्टर सिटीच्या एडर्सनला सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळाला.