प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात शिक्षणाला महत्त्व आहे. फुटबॉलपटू घडवण्याचा ध्यास घेतलेल्या डीएसके शिवाजियन्सने शिक्षणाचे महत्त्व ओळखून युवा फुटबॉलपटू बनवण्याचा वसा घेतला आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथे फुटबॉल अकादमी स्थापन करून इंग्लिश प्रीमिअर लीगमधील लिव्हरपूल या दिग्गज क्लबशी त्यांनी करार केला आहे. युवा खेळाडूंना लिव्हरपूलच्या सहप्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार असून वर्षांतून एकदा इंग्लंडमध्ये जाऊन लिव्हरपूलच्या खेळाडूंसोबत आठवडाभर सराव करण्याची संधीही मिळणार आहे.
देशभरातील प्रमुख शहरांमधून निवड चाचणीद्वारे ६४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी १७ आणि १९ वर्षांखालील गटासाठी ६४ खेळाडूंची भर पडणार आहे. मात्र अद्ययावत प्रशिक्षणासाठी १९ वर्षांखालील खेळाडूंना ४.५ लाख तर १७ वर्षांखालील खेळाडूंना ३.५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या वर्षांसाठी खेळाडूंना ५० टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यात त्यांना आधुनिक दर्जाचे प्रशिक्षण. अभ्यास. आहार आणि निवास अशा सुविधांचा लाभ उठवता येणार आहे. या दोन्ही गटांतील विद्यार्थी किमान दहावी पास असल्यामुळे त्यांच्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण तसेच दूरस्थ शिक्षणाचीही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लोणी काळभोर येथील डीएसकेच्या उपक्रमाअंतर्गत खेळांवर भर दिला जाणार आहे. त्याअंतर्गत या खेळाडूंसाठी डीएसके शिवाजीयन्स-लिव्हरपूल फुटबॉल अकादमी उभारण्यात आली असून त्यात सरावासाठी दोन मदान आणि एक स्टेडियम. जलतरण तलाव तसेच आधुनिक जीमचा समावेश असणार आहे. प्रत्येक मदानावर अ‍ॅस्ट्रोटर्फ बसवण्यात आली असून त्यासाठी किमान ६० ते ८० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ३६ क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून नऊ खेळांच्या अकादमी उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ३०० ते ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुरुवातीला फुटबॉलवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून हळूहळू बाकीच्या खेळांच्या अकादमीसुद्धा उभारण्यात येतील.