लंडन : लुइस डियाझ आणि रॉबटरे फिरमिनो यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या बळावर लिव्हरपूलने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात बोर्नमथवर ९-० अशी मात केली. या कामगिरीमुळे लिव्हरपूलने प्रीमियर लीगमधील सर्वात मोठय़ा विजयाच्या विक्रमाशी बरोबरी केली.

डियाझने तिसऱ्या मिनिटाला गोलचे खाते उघडल्यानंतर हार्वी एलिएटने (सहाव्या मिनिटाला) लिव्हरपूलची आघाडी दुप्पट केली. मग ट्रेंट अ‍ॅलेक्झांडर-आर्नोल्डने (२८व्या मि.) तिसरा गोल केला. यानंतर फिरमिनोने ३१व्या, तर व्हर्जिल व्हॅन डाइकने ४५व्या मिनिटाला गोल झळकावत मध्यंतरापर्यंत लिव्हरपूलला ५-० अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धात ख्रिस मेमफेनने (४६व्या मि.) स्वयंगोल केल्याने लिव्हरपूलच्या खात्यात सहाव्या गोलची भर पडली. मग ६२व्या मिनिटाला फिरमिनोने संघासाठी सातवा गोल केला. फॅबियो काव्‍‌र्हालियोने (८०व्या मि.) आणखी एक गोल करत संघाची आघाडी ८-० वाढवली. अखेर ८५व्या मिनिटाला डियाझने पुन्हा गोल झळकावत लिव्हरपूलला मोठा विजय मिळवून दिला.

मँचेस्टर युनायटेड, सिटी, चेल्सी विजयी

एर्लिग हालंडच्या (६२, ७०, ८१व्या मिनिटाला) हॅटट्रिकच्या बळावर मँचेस्टर सिटीने क्रिस्टल पॅलेसवर ४-२ अशा फरकाने विजय मिळवला. बर्नाडरे सिल्वाने (५३व्या मि.) सिटीचा चौथा गोल केला. अन्य लढतीत, ब्रुनो फर्नाडेसने (५५व्या मि.) झळकावलेल्या निर्णायक गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने साऊदम्प्टनवर १-० अशी मात केली. तर रहीम स्टर्लिगच्या (४७ आणि ६३व्या मि.) दोन गोलमुळे चेल्सीने लिस्टर सिटीला २-१ असे नमवले.