आठवडय़ाची मुलाखत : जॉन अब्राहम, नॉर्थईस्ट संघ सहमालक
इंडियन सुपर लीगने (आयएसएल) भारतातील फुटबॉलला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. या यशस्वी वाटचालीत दुर्लक्षित ईशान्य भारताचा मोठा वाटा आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी क्लबने ईशान्य भारतातील प्रतिभावान खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आणि ईशान्य भारतातील हीच शक्ती देशातील फुटबॉल वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असे मत नॉर्थ ईस्ट युनायटेडचा मालक आणि बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम याने व्यक्त केले. आयएसएलचे जेतेपदाचे लक्ष्य, ईशान्य भारतातील गुणवत्तेला वाव देण्यासाठी अकादमी स्थापन करण्याचा निर्धार या मुद्दय़ांवर जॉनने ‘लोकसत्ता’सोबत केलेली बातचीत..
- नॉर्थ ईस्ट युनायटेड गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे आत्तापासून जेतेपदाचे स्वप्न पाहायला हरकत नाही?
– अजून बराच पल्ला पार गाठायचा आहे, परंतु आम्ही आशावादी आहोत. संघाने सातत्यपूर्ण खेळ करण्याची आवश्यकता आहे आणि आशा करतो की, संघ बाद फेरीत प्रवेश मिळवण्यात यशस्वी होईल, जे आमचे पहिले लक्ष्य आहे.
- ईशान्य भारतातील अधिकाधिक खेळाडूंना संघात स्थान देण्याचा तुझा आग्रह असतो, यामागचे कारण?
– ईशान्य भारत हा फुटबॉलचे नंदनवन आहे, असे म्हणायला हरकत नाही. देशातील फुटबॉलच्या यशस्वी वाटचालीला प्रेरणा देणारे यंत्र म्हणून ईशान्य भारताचा उल्लेख करायला हवा. त्यामुळे या भागातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी हे व्यासपीठ आहे. या खेळाडूंना त्यांची गुणवत्ता मोठय़ा स्तरावर दाखवण्याची संधी आम्हाला द्यायची आहे.
- पण, युनायटेडच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत युसा, कोफी, इमिलियानो आणि निकोलस यांच्यावर तुम्ही जास्त अवलंबून आहात, असे दिसते?
– अजिबात नाही. ही फळी संघाच्या आक्रमणाची धुरा अगदी सक्षमपणे सांभाळत आहे. गोल करण्याच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे; पण त्यांची ही जबाबदारी पार पाडण्यासाठी इतर खेळाडूंची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. त्यांच्याशिवाय ही आक्रमक फळी पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे या तिघांवर आम्ही अवलंबून आहोत, असे म्हणणे चुकीचे ठरेल.
- नॉर्थ ईस्ट युनायटेड क्लब निवडण्यामागचे कारण?
– याआधीच सांगितल्याप्रमाणे भारतीय फुटबॉलचे हे नंदनवन आहे, असे मला वाटते. संपूर्ण ईशान्य भारताला फुटबॉलच्या माध्यमातून एकत्र आणण्याची हीच संधी होती आणि त्यात आम्ही काही अंशी यशस्वी झालो आहोत.
- ईशान्य भारतातील प्रतिभावान खेळाडूंना वाव देण्यासाठी अकादमी स्थापन करण्याचा तुझा मानस आहे का?
– हो. येथे क्रीडा अकादमी स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या दृष्टीने कामही सुरू आहे. लवकरच तुम्हाला ती पाहायला मिळेल.
- प्रशिक्षक नेको विंगाडा यांच्या प्रशिक्षण पद्धतीने तुला प्रभावित केले आहे का?
– नक्कीच. विंगाडा यांची प्रशिक्षणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. त्यांचा दृष्टिकोन खूप प्रेरणादायी आहे आणि आमचे जे लक्ष्य आहे ते साध्य करण्यासाठी त्यांचे संपूर्ण सहकार्य मिळते.