आठवडय़ाची मुलाखत  मुरली श्रीशंकर, आंतरराष्ट्रीय उंच उडीपटू

तुषार वैती, लोकसत्ता

मुंबई : फेडरेशन चषक स्पर्धेनंतर मी माझ्या कच्च्या दुव्यांवर कसून सराव करत आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मी ८.३५ मीटर कामगिरी नोंदवण्याचे ध्येय बाळगले आहे. माझी कामगिरी सुधारल्यास नक्कीच ऑलिम्पिक पदकावर नाव कोरू शकेन, असा विश्वास भारताचा उंच उडीपटू मुरली श्रीशंकर याने व्यक्त केला.

श्रीशंकरने दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ८.२६ मीटर कामगिरी करत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आणि ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. ऑलिम्पिकची तयारी आणि भारताच्या कामगिरीविषयी श्रीाशंकरशी केलेली ही बातचीत-

’  सध्या टोक्यो ऑलिम्पिकची तयारी कशी सुरू आहे?

करोनामुळे सध्या टाळेबंदी असली तरी माझी तयारी उत्तम सुरू आहे. दरदिवशी सरावासह अन्य गोष्टींवरही मी मेहनत घेत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधांमुळे स्पर्धासाठी बाहेर जाता येत नाही, हीच माझ्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. सध्या जैव-सुरक्षा परिघाबद्दल खेळाडू तक्रार करत असले तरी त्यांनी सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येक स्पर्धेसाठी खेळाडूंना विविध चाचण्यांना सामोरे जावे लागणार असल्यामुळे प्रत्येकाने स्वत:ला सुरक्षित ठेवले पाहिजे.

’  तुझी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८.२६ मीटर असतानाही तू ऑलिम्पिकमध्ये ८.३५ मीटर उडी मारण्याचे लक्ष्य ठेवले आहेस, त्याबद्दल काय सांगशील?

टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर मी माझ्यातील कच्चे दुवे हेरून त्यावर मेहनत घ्यायला सुरुवात केली. तांत्रिकदृष्टय़ा कुठे कमी पडतो, हे तज्ज्ञांकडून जाणून घेतले. ऑलिम्पिकला अद्याप ५० दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे माझे कौशल्य सुधारता येणार आहे. त्यामुळे मी हे लक्ष्य पार करू शकेन, असा विश्वास आहे. माझे प्रशिक्षक आणि वडील एस. मुरली यांच्यासह केरळमधील पलक्कड येथे माझा सराव सुरू असून भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाकडूनही मला सर्वतोपरी मदत मिळत आहे. आशियाई देशांमध्ये आम्हाला स्पर्धेला कसे पाठवता येईल, यासाठी महासंघ प्रयत्न करत आहे.

’  टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तुला कितपत पदकाच्या अपेक्षा आहेत?

माझ्या प्रकारात स्पर्धा खूपच तीव्र आहे. त्यामुळे बलाढय़ प्रतिस्पध्र्यावर मात करून पदक मिळवणे सोपे नाही. पण वैयक्तिक कामगिरीपेक्षाही सरस कामगिरी करण्याचे ध्येय मी आखले आहे. जर ८.३५ मीटर कामगिरीचे ध्येय साकारता आले तर मी निश्चितपणे ऑलिम्पिक पदकावर नाव कोरेन, असा विश्वास आहे.

’  भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये पदकाने कायम हुलकावणी दिली आहे. यंदा कोणता खेळाडू देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचे स्वप्न साकार करू शकेल?

अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताचे अनेक खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. सर्वाचा सरावही उत्तम सुरू आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. चालण्याच्या शर्यतीत केटी इरफान बहरात आहे. अविनाश साबळेने दमदार कामगिरी करत सर्वानाच प्रभावित केले आहे. त्यामुळे  यावेळचा संघ दमदार असल्यामुळे भारताचे अ‍ॅथलेटिक्सच्या ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न नक्कीच साकार होईल, अशी आशा आहे.

’  ऑलिम्पिकआधी पुरेशा स्पर्धामध्ये खेळण्याची संधी मिळत नाही, अशी तक्रार तुझ्यासह नीरज चोप्रानेही केली आहे, त्याबद्दल काय सांगशील?

बरेचसे खेळाडू ऑलिम्पिकच्या दोन-तीन महिने आधी परदेशात जाऊन कसून सराव करतात. पण या वेळी करोनामुळे परदेशात सराव करायला आणि स्पर्धामध्ये खेळायला मिळत नाही. मात्र ऑलिम्पिकआधी मला दोन ते तीन स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. जेणेकरून मला ऑलिम्पिकसाठी स्वत:ची क्षमता सिद्ध करता येईल. पण युरोपियन किंवा आशियाई देशांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही तर मी देशांतर्गत स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे. आठ मीटपर्यंत उडी मारू शकतील असे खूप खेळाडू भारताकडे आहेत. त्यामुळे ऑलिम्पिकला रवाना होण्यापूर्वी माझा चांगला सराव होईल.