ब्राझीलचा नवा तारा नेयमार आणि नवे प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांचे बार्सिलोनाच्या दणदणीत विजयामुळे संघात धडाक्यात पदार्पण साजरे झाले. पहिल्याच सामन्यात नेमयार याच्यावर साऱ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या, पण सामना गाजवला तो लिओनेल मेस्सीने. लेव्हान्टे संघावर ७-० असा दणदणीत विजय मिळवत बार्सिलोनाने या मोसमाची दणक्यात सुरुवात केली. परंतु या सामन्यात दोन गोल झळकावत मेस्सी नेयमारपेक्षा जास्त भाव खाऊन गेला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच बार्सिलोना संघाने आक्रमण केले. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला अ‍ॅलेक्सिस सँचेझने गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर मेस्सीने १२व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाची आघाडी वाढवण्यावर भर दिला. मेस्सी एक गोल करून शांत बसला नाही, तर सामन्याच्या ४२व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत त्याने आपले कर्तृत्व दाखवले. प्रेडो रॉड्रिग्जनेही सामन्याच्या २६व्या आणि ७३व्या मिनिटाला गोल केले, तर कर्णधार झेव्ही हर्नाडिसने ४५व्या आणि डॅनियल अल्व्हेसने २४व्या मिनिटाला गोल केले.
पहिला गोल करणाऱ्या सँचेझला सामन्याच्या ६४व्या मिनिटाला आतमध्ये बोलावले गेले आणि त्याच्या जागी नेयमारला खेळवण्यात आले. उत्साही नेयमारने दमदार खेळ केला असला तरी त्याला गोल करण्यात मात्र अपयश आले. सामन्याच्या ८८व्या मिनिटाला पंचांनी नेयमारला ताकीद देत पिवळे कार्ड दाखवले.