खेडमधील महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी कबड्डीरसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या गर्दीमुळे मुंबईतील निराशाजनक उपस्थितीमुळे निर्माण झालेली स्पध्रेवरची मरगळ कोकणवासियांनी खऱ्या अर्थाने दूर केली. यजमान रत्नागिरी संघाचा सांगलीशी सामना असल्याने ही गर्दी झाली असली तरी असाच  प्रतिसाद कायम राहण्याची शक्यता असल्याचा आयोजकांचा अंदाज आहे.
राज्यातील ग्रामीण भागात क्रिकेटपेक्षा कबड्डीला अधिक लोकप्रियता असून कोकणामध्ये यासाठी सर्वोत्तम वातावरण आहे, असे लीगच्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मुंबईनंतर दुसरा टप्पा खेड व तिसरा टप्पा अलिबाग येथे आयोजित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. खेडमध्ये पहिल्याच दिवशी महाकबड्डी लीगला जवळपास दोन हजार क्रीडाप्रेमींनी हजेरी लावली.
आयोजनाबाबत लीगचे समन्वयक आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष शांताराम जाधव यांनी सांगितले, ‘‘संपूर्ण देशात महाराष्ट्रातच कबड्डीला सर्वात चांगले वातावरण आहे. कबड्डी संघटनेशी संलग्न असलेले राज्यभरातील हजारो संघ आणि लाखो कबड्डीपटू त्याचीच साक्ष देतात. हा खेळ मुळात ग्रामीण भागात अधिक फैलावलेला आहे. साहजिकच त्यादृष्टीने लीग स्पर्धाचे नियोजन यापुढे करण्यात येणार आहे. अनेक मागास भागात कबड्डीचा चांगला प्रसार झालेला आहे. पण वलय नसल्याने फ्रँचायजीसाठी कोणी पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे अशा भागातील कबड्डीपटूंनाही वाव मिळण्याच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे पँथर्सची विजयी सलामी
महाकबड्डी लीगच्या खेड येथे सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या लढतींमध्ये पुणे पँथर्सने महिलांमध्ये सांगली रॉयल्स संघावर ४१-२४ असा विजय मिळवला. पुण्याने सांगलीच्या खेळाडूंच्या पकडी करत आक्रमक सुरुवात केली. मध्यंतराला पुण्याकडे २१-१२ अशी आघाडी होती. संघनायक पूजा केणीने चौफेर चढाया करत जबरदस्त वर्चस्व गाजवले. पूजाने १३ गुणांची कमाई केली. मीनल जाधवने ८ पकडी आणि २ बोनस गुणांसह १२ गुण मिळवले. सांगलीतर्फे पूजा शेलारने ९ गुण मिळवले. स्नेहल साळुंखेने ५ गुणांसह पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.
पुरुष विभागात सांगली रॉयल्स संघाने यजमान रत्नागिरी रायडर्स संघावर ४०-२८ अशी मात केली. १२ गुणांसह भागेस भिसे सांगलीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मध्यंतराला सांगलीकडे २०-१२ अशी आघाडी होती. आनंद पाटील, रोहित बन्ने यांनी भागेशला चांगली साथ दिली. यजमान रत्नागिरीतर्फे अभिषेक भोजने आणि शिवराज जाधव या दोघांनी प्रत्येकी ३ गुण मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha kabaddi league
First published on: 22-05-2015 at 04:02 IST