CM Devendra Fadnavis Meets Team India: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेत भारतीय महिला संघाने इतिहास घडवला आहे. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत पहिल्यांदाच जेतेपदाचा मान पटकावला. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. भारतीय महिला खेळाडूंनी दिल्लीत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग असलेल्या महाराष्ट्राच्या ३ खेळाडूंची भेट घेतली आहे.

भारतीय महिला संघासाठी हा विजय खूप मोठा आहे. कारण महिला संघाला याआधी विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावता आलेलं नव्हतं. दरम्यान बुधवारी भारतीय महिला खेळाडू दिल्लीत दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वचषकविजेत्या भारतीय संघासोबत फोटोशूट केलं. त्यानंतर खेळाडूंशी संवाद साधला. त्यानंतर देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देखील खेळाडूंची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. शुक्रवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील खेळाडू स्मृती मानधना, राधा यादव आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं. विश्वचषक जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने तिन्ही खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं. तर संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजूमदार यांना २२.५ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. या कार्यक्रमात बक्षिसाची रक्कम खेळाडूंना देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवींसांकडून भारतीय खेळाडूंचं कौतुक

देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं. ते म्हणाले, “आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. महिला संघाने विश्वचषक जिंकला आहे. याआधी, आपण विश्वचषक इतर देशांमध्ये जाताना पाहिलं आहे. पण तुम्ही (महिला संघाने) आता सगळं काही बदलून टाकलं आणि विश्वचषक घरी आणला आहे. तुम्ही इतिहास रचला आहे.”

यासह देवेंद्र फडणवीसांनी जेमिमा रॉड्रिग्जचंही कौतुक केलं. जेमिमाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात दमदार शतकी खेळी केली होती. या खेळीचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जेमिमाने सेमीफायनलमध्ये जी निर्णायक खेळी केली, त्या खेळीमुळेच आपल्याला फायनल पाहायला मिळाली. जेमिमा आपल्या फलंदाजीसह रिल्समुळेही चर्चेत असते. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कधी कधी तिची फलंदाजी चांगली असते की तिचे रिल्स चांगले असतात, असा प्रश्न आपल्याला पडतो. ती मैदानावर डबल एंटरटेनमेंट करते. मध्ये मध्ये जे गाणं वाजतं, त्यावर ती प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं काम करते.”

तसेच अमोल मुझुमदारांबद्दल बोलताना म्हणाले, ” अमोल मुझुमदार यांनी फार मेहनत घेतली आहे. त्यांची स्टोरी व्हायरल झाली. मी आत्ताच भाकीत करतो, तुमच्यावर सिनेमा निघणार आहे.” अमोल मुझुमदार हे भारतीय महिला संघाला चॅम्पियन बनवणारे पहिलेच प्रशिक्षक ठरले आहेत.