चीनमधील आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या धावपटू अंजना ठमकेला गुरुवारी नाशिकमधील आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या वतीने ११ लाख रुपये इनाम देऊन गौरविण्यात येणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात दुपारी १२.३० वाजता हा कार्यक्रम होणार असून विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके, आदिनासी विकास मंत्री मधुकर पिचड, पालकमंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री राजेंद्र गावित यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास राहणार आहे. आदिवासी विकास विभागामार्फत नाशिक विभागात २२२ शासकीय आश्रमशाळा, २०९ अनुदानित आश्रमशाळा तर, ठाणे विभागात १२९ शासकीय आश्रमशाळांचे कामकाज पाहण्यात येते. या आश्रमशाळांमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देणे, तसेच आश्रमशाळांतील शिक्षक व आश्रमशाळांचा गुणगौरवही शिक्षकदिनानिमित्त करण्यात येणार आहे.