दिलीप खांडवीला वीर अभिमन्यू आणि जान्हवी पेठेला जानकी पुरस्कार
मुंबई : सुरत येथील एसएमसी स्कूलच्या क्रीडांगणावर झालेल्या ३९व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार-कुमारी खो-खो स्पर्धेत सलग सहाव्यांदा महाराष्ट्राने दुहेरी मुकुट संपादन केला. महाराष्ट्राच्या कुमारांचे हे सलग १५वे तर मुलींचे हे सलग सहावे विजेतेपद ठरले.
कुमारांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरवर १३-१२ असा साडेतीन मिनिटे राखून एक गुणाने दणदणीत विजय साजरा केला. महाराष्ट्राच्या दिलीप खांडवीने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार मिळवताना एक मिनिट व तीन मिनिटे संरक्षण करताना चार खेळाडू बाद केले, सौरभ आहिरने दोन्ही डावांत प्रत्येकी दोन-दोन मिनिटे संरक्षण केले व एक खेळाडू बाद केला. रामजी कश्यपने एक मिनिट तीस सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला तर आदित्य गणपुलेने एक मिनिट व एक मिनिट ५० सेकंद संरक्षण करताना दोन खेळाडू बाद करून विजयात महत्त्वाची कामगिरी नोंदवली. कोल्हापूरच्या विशाल कुसळेने दोन मिनिटे २० सेकंद संरक्षण करत एक खेळाडू बाद केला व रोहन शिंगाडेने चार खेळाडू बाद करत कोल्हापूरकडून जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला.
स्पर्धेतील सर्वोत्तम संरक्षकाचा पुरस्कार महाराष्ट्राच्या सौरभ आहिर व स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमकाचा पुरस्कार कोल्हापूरच्या रोहन शिंगाडेने मिळवला.
मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रने कर्नाटकाचा ९-७ असा एक मिनिट, ४० सेकंद राखून दोन गुणांनी दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राच्या अश्विनी पासिने दोन मिनिटे व एक मिनिट २० सेकंद संरक्षण करताना एक खेळाडू बाद केला. रेश्मा राठोडने दोन मिनिटे, २० सेकंद व तीन मिनिटे, २० सेकंद संरक्षण करताना दोन खेळाडू बाद केले. जानवी पेठेने दोन मिनिटे व एक मिनीट, ४० सेकंद संरक्षण केले, श्वेता वाघने नाबाद दोन मिनिटे, ४० सेकंद संरक्षण करताना दोन खेळाडू बाद केले तर रितिका मगदूमने तीन खेळाडू बाद करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. कर्नाटकच्या बी. चित्राने तीन मिनिटे, ४० सेकंद व दोन मिनिटे संरक्षण केले. तेजस्विनीने एक मिनिट, ३० सेकंद व दोन मिनिटे, ४० सेकंद संरक्षण केले तर वरलक्ष्मीने तीन खेळाडू बाद करून जोरदार लढा देण्याचा प्रयत्न केला.
मुलींमध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा जानकी पुरस्कार महाराष्ट्राच्या जान्हवी पेठेने मिळवला, तर स्पर्धेतील सरंक्षक आणि सर्वोत्तम आक्रमक हे पुरस्कार अनुक्रमे रेश्मा राठोड (महाराष्ट्र) आणि वरलक्ष्मीने (कर्नाटक) पटकावले.
३१ महाराष्ट्राने कुमार गटात ३९ राष्ट्रीय स्पर्धापैकी ३१व्यांदा विजेतेपद संपादन केले आहे.
२२ महाराष्ट्राने कुमारी गटात ३९ राष्ट्रीय स्पर्धापैकी २२व्यांदा विजेतेपद पटकावले आहे.
०६ महाराष्ट्राने कुमार-कुमारी राष्ट्रीय स्पर्धेत सलग सहाव्यांदा दुहेरी मुकुटाचा मान मिळवला.
१५ महाराष्ट्राने कुमार गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सलग १५व्यांदा विजेतेपद पटकावले.
