भारतात सध्या क्रीडाप्रेमींमध्ये आयपीएल स्पर्धेचे वातावरण आहे. भारतीय संघातील अनेक महत्वाचे खेळाडू आयपीएल स्पर्धेतील विविध संघांतून खेळताना दिसत आहेत. मंगळवारी सरावादरम्यान भारतीय संघातील महत्वाचा खेळाडू आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. विश्वचषकासाठी सगळ्या महत्त्वाच्या खेळाडूंनी तंदुरूस्त रहावे आणि त्यासाठी आयपीएलमध्ये खेळताना काळजी घ्यावी तसेच शक्य तितके कमी सामने खेळावेत असे मत काही क्रीडापटूंनी याआधीही व्यक्त केले आहे.
आज बुधवारी मुंबईचा संघ पंजाबबरोबर भिडणार आहे. या सामन्याच्या पुर्वसंध्येला सराव करताना रोहित शर्माच्या डाव्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचे फिजीओ नितीन पटेल यांनी रोहित शर्माला मैदानातून बाहेर नेले. दुखापतग्रस्त रोहितला पाहून मुंबईच्या संघात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज होणाऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र फिजीओ नितीन पटेल यांच्या मते रोहितची दुखापत फारशी गंभीर नसून लवकरच तो मैदानात खेळताना दिसेल.
रोहित शर्माच्या खांद्यावर भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. नेतृत्व करताना विराट कोहलीला रोहित ची मदत होते. शिवाय भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार रन मशीन विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा यांच्यावर अवलंबून आहे. भारताची पूर्ण फलंदाजी सध्या या दोन फलंदाजांच्या अवतीभोवती फिरते. या अनुषंगाने विचार करता तब्बल चार वर्षातून एकदा येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी या दोघांनी पूर्णपणे तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे.
विश्वचषक स्पर्धा आता काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. आययपीएलमध्ये संघातील आघाडीच्या खेळाडूंना दुखापत होणे भारतासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे खेळाडूंनी आयपीएलच्या मोहात न पडता आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावे अशी चाहत्यांची भावना आहे.