बायर्न म्युनिकआणि मँचेस्टर सिटी संघांनी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत अंतिम सोळामध्ये धडक मारली. गतविजेत्या बायर्न म्युनिकने व्हिक्टोरिया पिल्सेनवर १-० अशी मात केली, तर मँचेस्टर सिटीने सीएसकेएचा ५-२ असा धुव्वा उडवला. गतविजेत्या बायर्न म्युनिक संघाने लौकिकाला साजेसा खेळ करत बाद फेरी गाठली, तर मँचेस्टर सिटीने गेल्या दोन हंगामात प्राथमिक फेरीत बाद होण्याचा इतिहास बदलत दिमाखदार विजयासह बाद फेरीत आगेकूच केली. मध्यंतरानंतर मारिओ मंडझुकिकने ६५व्या मिनिटाला गोल करत बायर्नचे खाते उघडले. हा एकमेव गोलच बायर्नच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
दुसऱ्या लढतीत मँचेस्टर सिटीने सीएसकेएवर ५-२ असा दणदणीत विजय मिळवला. नेग्रेडोने तीन आणि सर्जिओ ऑग्युरोने दोन गोल केले. रिअल माद्रिद आणि ज्युवेन्टस यांच्यातील लढत २-२ अशी बरोबरीत संपली.