मँचेस्टर : गतविजेत्या आणि गेल्या सात हंगामांत चार वेळा चॅम्पियन्स लीग फुटबॉलचे जेतेपद पटकावणाऱ्या रेयाल माद्रिद संघाच्या वर्चस्वाला मँचेस्टर सिटीने धक्का दिला. उभय संघांमधील उपांत्य फेरीचा पहिल्या टप्प्यातील सामना १-१ असा बरोबरीत संपला होता. परंतु बुधवारी मध्यरात्री झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात सिटीने रेयालवर ४-० असा मोठा विजय साकारला. त्यामुळे सिटीने ही लढत एकूण ५-१ अशा गोलफरकाने जिंकत चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली.

चॅम्पियन्स लीगमध्ये रेयाल माद्रिदला नमवणे अशक्यप्राय आव्हान मानले जाते. रेयालने तब्बल १४ वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. मात्र, पेप ग्वार्डियोला यांच्या मार्गदर्शनाखालील मँचेस्टर सिटीने रेयालला सर्वोत्तम खेळ करण्यापासून रोखले. घरच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात सिटीने आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाडय़ांवर रेयालपेक्षा सरस खेळ केला. विशेषत: सिटीच्या मध्यरक्षकांनी रेयालकडे चेंडूचा फार वेळ ताबा राहणार नाही याची काळजी घेतली.

पूर्वार्धात पूर्णपणे सिटीचे वर्चस्व राहिले. सुरुवातीच्या काही मिनिटांत सिटीचा आघाडीपटू अर्लिग हालँडने मारलेले दोन फटके रेयालचा गोलरक्षक थिबो कोर्टवाने अप्रतिमरित्या अडवले. मात्र, २३व्या मिनिटाला केव्हिन डीब्रूएनेच्या पासवर बर्नाडरे सिल्वाने गोल करत सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. बर्नाडरेनेच ३७व्या मिनिटाला सिटीची आघाडी दुप्पट केली. मध्यंतरापर्यंत सिटीने दोन गोलची आघाडी राखली. उत्तरार्धात रेयालने आक्रमणाला गती देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. याउलट सिटीने ७६व्या मिनिटाला मॅन्युएल अकान्जी, तर ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत ज्युलिअन अल्वारेज यांनी केलेल्या गोलमुळे हा सामना ४-० अशा फरकाने जिंकत आगेकूच केली.

तीन जेतेपदांची संधी

मँचेस्टर सिटीला अजूनही तीन स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. शनिवार, १० जून रोजी (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री) होणाऱ्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम लढतीत सिटीसमोर इंटर मिलानचे आव्हान असेल. त्याचप्रमाणे येत्या रविवारी (२१ मे) चेल्सीवर विजय मिळवण्यात यश आल्यास मँचेस्टर सिटी सलग तिसऱ्यांदा प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवेल. सिटीचा संघ ‘एफए चषक’ स्पर्धेच्याही अंतिम लढतीत खेळणार असून त्यांच्यासमोर मँचेस्टर युनायटेडचे आव्हान असेल.

मँचेस्टर सिटीने दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली. यापूर्वी २०२०-२१च्या हंगामात सिटीने ही कामगिरी केली होती. त्या वेळी त्यांना अंतिम फेरीत चेल्सीकडून पराभव पत्करावा लागला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत रेयाल माद्रिदविरुद्ध दोन गोल करणारा बर्नाडरे सिल्वा केवळ तिसरा खेळाडू ठरला. याआधी लिओनेल मेसी (२०११) आणि रॉबर्ट लेवांडोवस्की (२०१३) यांनी अशी कामगिरी केली होती.