मेलबर्नवरील अंतिम लढतीत चार वेळा जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान

मेलबर्न : कोणालाही फारशी अपेक्षा नसताना युवा-अनुभवी खेळाडूंचा योग्य मेळ साधून अंतिम फेरीपर्यंत धडक मारणारा भारत आणि दडपणाच्या परिस्थितीत अनुभवाच्या बळावर नेहमी सरशी साधणारा संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया. या दोघांपैकी कोणता संघ रविवारी महिला विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर मोहोर उमटवणार, याची तमाम क्रीडा चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला ‘जागतिक महिला दिना’निमित्त महिलांच्या महासंग्रामाचे रूप धारण झाले आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी केली असून रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा अखेरचा अडथळा ओलांडल्यास महिला क्रिकेट भारतात पुन्हा नव्याने भरारी घेईल. साखळी सामन्यांत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेश यांना धूळ चारून दिमाखात उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताला नशिबानेही साथ दिली. त्यामुळे इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना रद्द होऊनही त्यांना प्रथमच अंतिम फेरी गाठण्याची संधी लाभली.

मेग लॅनिंगच्या ऑस्ट्रेलियाकडे कौशल्यवान खेळाडूंचा भरणा असून स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच त्यांना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. पहिल्या लढतीत भारताविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियाला खडाडून जाग आली आणि त्यानंतर मागे वळून न पाहता त्यांनी गतविजेत्यांच्या थाटात खेळ केला. त्यामुळे अंतिम फेरीत घरच्या प्रेक्षकांसमोर चार वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला भारत कसे रोखणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शफाली, पूनम भारताची अस्त्रे

अवघ्या १६व्या वर्षी एखाद्या तिशीतील फलंदाजाला लाजवेल, अशा रीतीने फलंदाजी करणारी शफाली वर्मा आणि स्पर्धेत सर्वाधिक ९ बळी मिळवणारी अनुभवी फिरकीपटू पूनम यादव या दोघी भारताच्या प्रमुख अस्त्रे आहेत. त्याचप्रमाणे राधा यादव, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांचेही फिरकी त्रिकूट भारतासाठी निर्णायक भूमिका बजावू शकतात. कर्णधार हरमनप्रीत, वेदा कृष्णमूर्ती आणि स्मृती मानधना यांना २०१७च्या विश्वचषकातील अंतिम फेरीचा अनुभव आहे. त्यामुळे आतापर्यंतचे अपयश विसरून दडपणाखाली ते नक्कीच खेळ उंचावतील, अशी आशा सर्व भारतीय क्रिकेटचाहत्यांना आहे.

ऑस्ट्रेलियाची मदार सांघिक कामगिरीवर

जायबंदी एलिस पेरीच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाकडे लॅनिंग, बेथ मुनी, एलिसा हिली यांसारखे नामांकित फलंदाज उपलब्ध आहेत. त्याशिवाय गोलंदाजीत डेलिसा किमिन्स आणि जॉर्जिया वेरहॅम यांनी त्यांच्यासाठी सातत्याने चमकदार खेळ केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा सांघिक कामगिरीच्या बळावरच भारतासाठी धोकादायक ठरू शकते.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

सिडनीतील उपांत्य सामन्यांवर पावसाने वर्चस्व गाजवले होते. आता अंतिम फेरीत पावसाची शक्यता कमी असल्याचे भाकीत मेलबर्न येथील हवामान विभागाने वर्तवले आहे. त्याशिवाय येथील खेळपट्टी नेहमीप्रमाणे फलंदाजांना पोषक असेल. परंतु ढगाळ वातावरण निर्माण झाल्यास फिरकी गोलंदाजांचे चेंडू खेळण्यात फलंदाजांना अडथळा येऊ शकतो.

भारत

अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

* साखळी सामने

वि. ऑस्ट्रेलिया १७ धावांनी विजयी

वि. बांगलादेश १८ धावांनी विजयी

वि. न्यूझीलंड ३ धावांनी विजयी

वि. श्रीलंका ७ गडी राखून विजयी

* उपांत्य सामना  वि. इंग्लंड

(पावसामुळे सामना रद्द) गटसाखळीत अग्रस्थान मिळवल्याने भारताला पुढे चाल

ऑस्ट्रेलिया

अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

साखळी सामने 

वि. भारत १७ धावांनी पराभूत वि. श्रीलंका ५ गडी राखून विजयी

वि. बांगलादेश ८६ धावांनी विजयी

वि. न्यूझीलंड  ४ धावांनी विजयी

उपांत्य सामना 

वि. दक्षिण आफ्रिका ५ धावांनी विजयी

१-६ भारत ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामना खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलियाने सलग सहाव्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.

१ विश्वचषकाचे आयोजन करणाऱ्या संघानेच विजेतेपद मिळवण्याचा योग आतापर्यंत एकदाच जुळून आला आहे. २००९ मध्ये इंग्लंडने (वि. न्यूझीलंड, लंडन) अशी कामगिरी केली होती.

आम्ही फक्त पूनमविरुद्धच विशेष रणनीती आखत नसून भारताच्या सर्वच फिरकीपटूंपासून सावध राहण्याची आम्हाला आवश्यकता आहे. गोलंदाजी ही भारताची भक्कम बाजू असल्याचे आम्हाला ठाऊक असल्याने पहिल्या चेंडूपासूनच त्यांच्यावर दडपण टाकण्याचा आमचा प्रयत्न असेल. संघातील अनेक खेळाडूंना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळण्याचा अनुभव असल्याने यंदाही आम्हीच विजेतेपद मिळवू.

– मेग लॅनिंग, ऑस्ट्रेलियाची कर्णधार

९०,००० चाहत्यांची क्षमता असलेल्या एमसीजी स्टेडियममध्ये अंतिम फेरी खेळण्याचा अनुभव वेगळाच असेल. संघातील प्रत्येक खेळाडूला आपण विश्वचषक उंचावण्यापासून अवघ्या एका पावलावर आहोत, याची जाणीव आहे. आतापर्यंत स्पर्धेत जे काही झाले ते विसरून रविवारी नव्या जोमाने आम्ही मैदानात उतरू. ३१व्या वाढदिवशी भारताला जगज्जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावण्याचे माझे स्वप्न आहे.

– हरमनप्रीत कौर, भारताची कर्णधार

संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, पूनम यादव, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, रिचा घोष, हरलीन देओल.

ऑस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार), मेगान शूट, एलिसा हिली, रॅचेल हेन्स, एलिस पेरी, जेस जोनासन, डेलिसा किमिन्स, बेथ मूनी, निकोला कॅरे, अ‍ॅश्ले गार्डनर, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरहॅम, एरिन बर्न्‍स, मोली स्ट्रानो, अ‍ॅनाबेल सदरलँड.

सामन्याची वेळ : दुपारी १२.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, हिंदी १.