Sunil Gavaskar Statue: मुंबईतील वानखेडे स्टेडियम हे भारतातील ऐतिहासिक स्टेडियमपैकी एक आहे. या मैदानावर भारतीय संघाने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. तसेच याच मैदानावर सुरुवात करून सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. काही वर्षांपूर्वी याच मैदानावर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारण्यात आला होता. आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचा देखील पुतळा उभारण्यात आला आहे. दरम्यान स्टेडियममध्ये आपलाच पुतळा पाहून सुनील गावसकर भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे उद्धाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी शरद पवार आणि सुनील गावसकर यांच्या पुतळ्याचे देखील अनावरण करण्यात आले. ज्यावेळी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते इतके भावुक झाले होते की, त्यांना काय बोलु हेच सुचत नव्हतं.

काय म्हणाले सुनील गावसकर?

सुनील गावसकरांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सुरूवातीच्या दिवसांचा उल्लेख करताना मुंबई क्रिकेट असोसिएशनची तुलना आईच्या व्यक्तिमत्वाशी केली. ते म्हणाले, ” मी याआधीही म्हटले आहे की, मुंबई क्रिकेट असोसिएशन हे माझ्या आईसारखी आहे. मी ज्यावेळी शालेय स्तरावर खेळत असताना तिने माझा हात धरला होता. त्यानंतर इथूनच रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली. मुंबईसाठी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली हे माझं सौभाग्य आहे. माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच शिल्लक राहिलेले नाहीत. या सन्मानाने मी भारावून गेलो आहे.”

सुनील गावसकर हे भारताचे आणि मुंबईचे दिग्गज फलंदाज आहेत. आता त्यांचा सन्मान करण्यासाठी शरद पवार क्रिकेट संग्रहालयाच्या बाहेर शरद पवार आणि सुनील गावसकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. सुनील गावसकर यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले. ज्यात कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे. ज्यावेळी त्यांनी कसोटीत १० हजार धावांचा पल्ला गाठला, त्यावेळी गावसकरांनी अशीच पोझ दिली होती. त्यामुळे इथून पुढे जेव्हा जेव्हा या पुतळ्याकडे पाहिलं जाईल, तेव्हा सुनील गावसकरांनी भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये काय केलं आहे याची जाणीव नक्कीच होईल.