आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) व केंद्रीय क्रीडामंत्रालय यांना सात मे रोजी लुसाने येथे बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. आयओएवरील बंदीबाबत चर्चा करण्याबाबत ही बैठक बोलविण्यात आली आहे.
ही बैठक १५ व १६ एप्रिल रोजी होणार होती मात्र आयओए व क्रीडा मंत्रालय यांच्यातील मतभेदांमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आयओएचे प्रभारी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी आयओसीला पत्र लिहून बंदीबाबत चर्चा घेण्याची मागणी केली होती. आयओसीने त्यानुसार लुसाने येथे बैठक घेण्याचे ठरविले आहे. आयओसीचे राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे जनसंपर्क संचालक पीअर मिरो यांनी आयओएला या संदर्भात लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, आयओए व क्रीडा मंत्रालय यांच्यातील मतभेदांबाबत आमच्याकडे मार्गदर्शन मागवित आम्हाला आयओएने पेचात टाकले आहे. हा प्रश्न त्यांचा अंतर्गत आहे. तरीही आम्ही दोघांनाही आमच्या कार्यालयात बैठकीसाठी बोलविले असून त्यामध्ये तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
आयओसीने आयओएकडून या बैठकीस येण्याचा १६ एप्रिलपूर्वी होकार मागितला आहे. दरम्यान त्यांनी क्रीडामंत्रालयासही पत्र लिहून या बैठकीचे निमंत्रण पाठविले आहे.
आयओसीने क्रीडा मंत्रालयास थेट निमंत्रण कसे पाठविले याबाबत आयओएने आश्चर्य व्यक्त केले आहे. यापूर्वी प्रत्येक वेळी आयओसीकडून आयओएकडे पत्रव्यवहार केला जात असे. आयओएच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने याबाबत सांगितले, ऑलिम्पिकच्या चळवळीत शासकीय हस्तक्षेप असू नये असा नियम आहे मात्र सात मे रोजी होणाऱ्या बैठकीचे थेट निमंत्रणच क्रीडा मंत्रालयाकडे पाठवित आयओसीने स्वत: केलेल्या नियमावलींचे पालन केलेले नाही.