विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून लिओनेल मेस्सीची निवड झाली. जेतेपदासह त्याला हा पुरस्कार मिळाला असता तर चार चाँद लागले असते मात्र तसे न झाल्याने लिओनेल मेस्सी निराश होणे साहजिक आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी शर्यतीत असणाऱ्या अन्य खेळाडूंना बाजूला सारत मेस्सीची निवड करण्यात आल्याने फिफावर जोरदार टीका होत आहे. फिफाच्या विपणन तंत्राचा भाग म्हणून मेस्सीला हा पुरस्कार दिल्याची चर्चा फुटबॉल वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे ‘मला पुरस्काराची पर्वा नाही. मी संघाला जेतेपद मिळवून देऊ शकलो असतो तर या पुरस्काराने मला आनंद आणि समाधान मिळाले असते. असे घडले नाही त्यामुळे मला पुरस्काराबद्दल काहीही वाटत नाही. तूर्तास तरी कशानेही माझे सांत्वन होणार नाही’ असे भावुक मेस्सीने सांगितले.
‘‘या विश्वचषकाचा पुन्हा एक अंतिम सामना व्हावा असे वाटते. आम्ही कठोर मेहनत करून अंतिम फेरी गाठली होती. आम्हाला जेतेपदाची संधीही होती. परंतु आम्ही जिंकू शकलो नाही. त्यामुळे मनात खुप राग आहे. मला, गोन्झालो हिएग्युन आणि रॉड्रिगो पलासिओ गोल करण्याची सर्वोत्तम संधी होती परंतु आम्ही कमी पडलो’. लक्षावधी देशवासियांचे स्वप्न आम्ही साकार करू शकलो नाही याचे वाईट वाटते’’, असे त्याने पुढे सांगितले.
मेस्सीने सर्वोत्तम फुटबॉलपटूचा ‘बलून डि ओर’ पुरस्कारावर त्याने बऱ्याचदा नाव कोरले आहे. बार्सिलोना क्लबला त्याने स्वबळावर असंख्य जेतेपदे मिळवून दिली आहेत. गोल करण्याची त्याची क्षमता अद्भुत आहे. सार्वकालिन महान खेळाडूंच्या मांदियाळीत स्थान पटकावण्यासाठी मेस्सीला अर्जेटिनाला विश्वविजेतेपद मिळवून द्यायचे होते. दिएगो मॅराडोना यांनी अर्जेटिनाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी मेस्सी आतूर होता मात्र आता त्याला पुढची चार वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2014 रोजी प्रकाशित
कशानेही माझे सांत्वन होणार नाही-मेस्सी
विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून लिओनेल मेस्सीची निवड झाली. जेतेपदासह त्याला हा पुरस्कार मिळाला असता तर चार चाँद लागले असते मात्र तसे न झाल्याने लिओनेल मेस्सी निराश होणे साहजिक आहे.

First published on: 16-07-2014 at 02:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Messi feels immense pain after crushing loss to germany in fifa world cup final