फुटबॉल म्हटलं की क्रीडाप्रेमींच्या डोळ्यापुढे प्रामुख्याने दोन नावे येतात. अर्जेंटिनाचा लिओनल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्टीआनो रोनाल्डो.. या दोन खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कोण? अशा चर्चा कायम रंगतात. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हादेखील फुटबॉलचा चाहता आहे. त्यामुळे त्याला एका मुलाखतीमध्ये रोनाल्डो किंवा मेसी यांच्यात भारी कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कोहलीने त्यावर अगदी रोखठोक उत्तर दिले.

 फुटबॉलपटूंकडून ‘हे’ शिकण्यासारखं – विराट कोहली

रोनाल्डो आणि मेसी भारी कोण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मेसी हा पूर्णपणे नैसर्गिक खेळ खेळतो. त्याच्यातील प्रतिभा ही त्याला मिळालेली दैवी देणगी आहे. त्याच्याकडे खेळण्याची जी कला आहे, तशी कला इतर कोणाकडेही नाही. पण रोनाल्डो मला अधिक आवडतो त्याचे कारण म्हणजे सामन्यात प्रत्येक मिनिटाला तो गोल करण्याच्या प्रयत्नात असतो. त्याला कायम सामन्यावर आणि फुटबॉल वर्चस्व राखायला आवडते. त्याच्या खेळीतील त्याचा हा गुण मला कायम आकर्षिक करतो. सामन्यात प्रत्येक मिनिटाला गोल करण्यासाठी जितकी इच्छाशक्ती  रोनाल्डोकडे दिसते तशी क्वचितच कोणाकडे दिसू शकते, असे विराट म्हणाला.

ख्रिस्टीआनो रोनाल्डो

याच मुलाखतीत विराटला ‘खेळाडू रोनाल्डो की रोनाल्डोमधील गुण (स्किल्स), काय अधिक आवडतं?’ असंही विचारण्यात आले. तेव्हा विराट म्हणाला की अशी निवड करणं खूपच कठीण आहे. खेळाडू म्हणून रोनाल्डो अत्यंत परिपक्व आहे. त्याच्यात परिपूर्ण खेळाडूचे सारे गुण दिसतात. उजव्या आणि डाव्या पायाचा खेळ, मैदानावरील गती, चेंडूवर वर्चस्व मिळवण्याची कला या साऱ्या गोष्टीत तो सर्वोत्तम आहे. त्याच्यापेक्षा चांगला गोल स्कोरर मी अजूनही पाहिलेला नाही. याउलट रोनाल्डोच्या स्किल्स आणि व्यक्तिमत्व याबाबत बोलायचे झाले तर ते वेगळे आहे. तो खेळात क्रांती करणाऱ्या विचारांचा आहे. त्यामुळे त्याला सारेच ‘फॉलो’ करतात. त्याचे स्थान प्रत्येकाच्या जीवनात खास आहे. पण जर मला माझ्या संघात या दोघांपैकी एकालाच निवडायचे असेल तर मी खेळाडू रोनाल्डोची निवड करेन”, असे विराटने स्पष्टपणे सांगितले.