अद्भुत गोलक्षमतेसाठी प्रसिद्ध लिओनेल मेस्सीचे चाहते जगभर पसरले आहेत. त्याची एक छबी टिपण्यासाठी, स्वाक्षरी मिळवण्यासाठी चाहते आसुसलेले असतात. मात्र मेस्सीप्रेमाची मोठी किंमत दुबईतील एका पोलीस अधिकाऱ्याला चुकती करावी लागणार आहे. मेस्सीचा पासपोर्ट घेऊन काढलेल्या व्हिडिओमुळे या अधिकाऱ्याला तुरुंगावास आणि दंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
ग्लोब सॉकर पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने मेस्सी गेल्या महिन्यात दुबईत दाखल झाला होता. या कार्यक्रमात सवरेत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने मेस्सीला गौरवण्यात आले. मेस्सीच्या संघालाही सवरेत्कृष्ट संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी विमानतळावर आगमन झालेल्या मेस्सीसह पोलीस अधिकाऱ्याला छायाचित्र काढायचे होते. मात्र मोठय़ा अंतराच्या प्रवासामुळे मेस्सी थकला असून, आता छायाचित्र मिळणार नाही असे मेस्सीच्या सहयोगींनी सांगितले.
या गडबडीत मेस्सीचे पारपत्र अर्थात पासपोर्ट कस्ट्म्स अधिकाऱ्यांच्या टेबलावरच राहिला. मेस्सीसह छायाचित्र काढण्याची इच्छा अपुरी राहिलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या हे लक्षात आले. त्याने हा पासपोर्ट स्वत:कडे घेत त्यासमवेत एक व्हिडीओ चित्रित केला. थोडय़ा वेळात त्याने हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर अपलोडही केला.
‘हा मेस्सीचा पासपोर्ट आहे. तो दुबईत आहे. या पासपोर्टचे मी काय करू? हा पासपोर्ट मी जाळून टाकू का त्याला सुपुर्द करू?’ या शब्दांत पोलीस अधिकारी व्हिडीओत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत होता. समाजमाध्यमांवर झटपट हा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओतील पोलिसाच्या आक्षेपार्ह भाषेमुळे तो अडचणीत सापडला. हे सगळे प्रकरण न्यायालयात गेले. पोलीस अधिकारी न्यायालयासमोर हजर झाला आणि त्याने आपला गुन्हा मान्य असल्याचे कबूल केले.
दुबईतील नियमांनुसार पोलीस अधिकाऱ्याला किमान सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि ९३ लाख दंडाची शिक्षा होऊ शकतो. मेस्सीच्या वैयक्तिक मालेमत्तेचा उपयोग केल्याचा आरोपही या पोलीस अधिकाऱ्यावर आहे.