WTC Final Mitchell Starc Record: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्ड्सच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, कांगारू संघ त्यांच्या दुसऱ्या डावात २०७ धावा करून सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाचा स्कोअर ८ विकेट गमावून १४४ धावा होता. पण तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्कने महत्त्वपूर्ण धावा करत जोश हेझलवूडबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, मिचेल स्टार्कने एका टोकाकडून डाव सावरत नाबाद ५८ धावांची खेळी करून संघाला सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्टार्कने त्याच्या खेळीच्या जोरावर एक खास विक्रमही आपल्या नावे केला आहे.

मिचेल स्टार्कने १३६ चेंडू खेळत ५ चौकारांसह ५८ धावा केल्या. ही धावसंख्या ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात फलंदाजाने केलेली सर्वाेच्च धावसंख्या होती. याचबरोबर जोश हेझलवूडने देखील स्टार्कला चांगली साथ दिली आणि मोठी भागीदारी रचली.

स्टार्कने या खेळीमुळे आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात एक अनोखा टप्पा गाठला. त्याच्या या खेळीमुळे तो नवव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका डावात ४० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू बनला. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या कोर्टनी ब्राउनच्या नावावर होता, ज्याने २००४ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या संस्मरणीय खेळीदरम्यान हा पराक्रम केला होता.

आयसीसी फायनलमध्ये ९ व्या किंवा त्याखालील क्रमांकाच्या फलंदाजाची सर्वाधिक धावसंख्या

मिचेल स्टार्क – ५८ धावा – ९व्या क्रमांकावर फलंदाजी – WTC फायनल २०२५
कोर्टनी ब्राऊन – ३५ धावा – ९व्या क्रमांकावर फलंदाजी – चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल २००४
इआन ब्रॅडशॉ – ३४ धावा – १०व्या क्रमांकावर फलंदाजी – चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल २००४

हेझलवूड-स्टार्कची भागीदारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांच्यातील ५९ धावांची भागीदारी ही लॉर्ड्सवरील पाहुण्या संघाकडून १० व्या विकेटसाठी पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक भागीदारी आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर १८८४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हॅरी बॉयल आणि टप स्कॉट यांच्यातील १० व्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी आहे.