श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकरा बुधवारी (२४ जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासात चामिंडा वास आणि लसिथ मलिंगा यांच्यानंतर नुवान कुलसेकरा हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक गडी टिपणारा वेगवान गोलंदाज आहे. कुलसेकराने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर जगभरातील चाहत्यांनी ट्विटवरुन त्याला शुभेच्छा दिल्या. अनेक श्रीलंकन चाहत्यांनी २०१४ टी- २० विश्वचषक जिंकून दिल्याबद्दल कुलसेकराचे आभार मानले. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनेही कुलसेकराला निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने कुलसेकराला दिलेल्या शुभेच्छा नेटकऱ्यांना चांगल्याच खटकल्या. अनेकांनी या ट्विटवरुन कैफला खडे बोल सुनावले.

कैफने निवृत्त होणाऱ्या कुलसेकराला श्रीलंकेचा पराभव झालेल्या २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील शेवटच्या सामन्याची आठवण करुन दिली. ‘नुवान कुलसेकरा निवृत्त झाला! एकेकाळी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज. पण प्रत्येक भारतीयासाठी कुलसेकरासंदर्भातील सर्वात आवडती आठवण म्हणजे, ‘Dhoni finishes off in style.. India lift the world cup after 28 years’ हे वाक्य आहे’ असं ट्विट कैफने केलं आहे. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतीम सामन्यामध्ये धोनीने लगावलेल्या उत्तुंग विजयी षटकाराचा फोटोही कैफने या ट्विटबरोबर पोस्ट केला आहे.

खरं तर भारतीय क्रिकेट इतिहासातील तो सोनेरी क्षण प्रत्येक भारतीयासाठी अविस्मरणीय आहे. मात्र निवृत्त होणाऱ्या एका चांगल्या प्रतिस्पर्ध्याला आणि क्रिकेटपटूला अशी आठवण करुन देणे योग्य नसल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. कैफने चुकीच्या वेळी चुकीचे ट्विट केल्याचे मत अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. केवळ श्रीलंकाच नाही तर भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही कैफला या ट्विटवरुन चांगलेच फैलावर घेतले आहे. पाहुयात काय म्हणाले आहे नेटकरी…

माफ करा पण कुलसेकराबद्दलची ही आमची आवडती आठवण आहे

हे आठवतयं का?

किती वाईट प्रतिक्रिया

एखाद्याची निवृत्ती अशी साजरी नाही करत

२०१४ मधील आठवण

माझा आवडता क्षण

लाज काढली भारतीयांची

कधी कुठे काय बोलावं कळत नाही

तुझ्याकडून ही अपेक्षा नाही

तुझ्यापेक्षा बराच

दरम्यान, ३७ वर्षीय नुवान कुलसेकरा याने १८४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९९ बळी टिपले. तर ५८ टी २० सामन्यांत ६६ बळी माघारी धाडले. त्याने १५ वर्षाची कारकीर्द घडवली. त्यात २१ कसोटी सामन्यात त्याने ४८ गडी बाद केले. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध २०१७ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर त्याने स्पर्धात्मक सामने खेळले नाहीत. २०१४ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत त्याने ८ गडी टिपत महत्वाची भूमिका बजावली होती.