Asia Cup 2025 Mohammad Nawaz Run Out Suryakumar Yadav: आशिया चषक २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानवर ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानने १७१ धावा केल्या. पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारताविरूद्ध चांगली सुरूवात केली. पण संघाचा फलंदाज मोहम्मद नवाज विचित्रपणे धावबाद झाला. सूर्यकुमारच्या अचूक टायमिंगचं सगळीकडे कौतुक आहे; ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर फरहानने चांगली फलंदाजी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने ४५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली. यानंतर पाकिस्तानच्या सर्व फलंदाजांनी १५-२० जणांची सातत्याने भर घातली. पण भारतीय गोलंदाजांसमोर १८० अधिक धावांचा आकडा पार करू शकले नाही.
सूर्या आधी थांबला अन् अचानक चेंडू थेट स्टंपवर मारला; मोहम्मद नवाज धावबाद
१९ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सलमान आघाने बुमराहविरूद्ध फटका खेळला आणि एक धाव घेतली. त्यानंतर नवाजने क्रीजमधून बाहेर येत दुसरी धाव घेत असल्याची टीम इंडियाला हुलकावणी दिली. पण क्रीजपासून काही अंतर लांब आल्यावरही गार्डनमध्ये फिरतात तसं हळूहळू चालत जात होता आणि गार्डनमध्ये फिरण्याच्या नादात सूर्याच्या अचूक थ्रोवर धावबाद झाला. नवाज क्रीजबाहेर असल्याचं सूर्यादादाने अचूक हेरलं आणि त्याने चेंडू क्षणार्धात फेकला.
सूर्यकुमार यादवने स्टम्पवर चेंडू मारताच नवाज जागा झाला आणि पटकन पुढे जायला पाहत होता. पण तो सीमारेषा क्रॉस करण्याआधीच चेंडू बरोबर बेल्सवर जाऊन बसला. मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आणि पाकिस्तानी खेळाडू क्रीजबाहेर असल्याचं दिसलं. मोहम्मद नवाज २१ धावांवर धावबाद झाला. नवाज अशा प्रकारे बाद होताना पाहून पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन खूप निराश झाले आणि पॅव्हेलियनमध्ये पोहोचल्यावर त्यांनी त्याच्याकडे पाहिल देखील नाही. एवढंच नाही तर पाकिस्तानी चाहते त्याला भयंकर ट्रोल करताना दिसले.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने कमालीची फलंदाजी केली. भारताकडून १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी १०५ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाचा पाया रचला. अभिषेक शर्माने ७४ धावांची तर शुबमन गिलने ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तिलक वर्माने १९ चेंडूत ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.