भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या वडिलांचे शुक्रवारी दिल्लीमध्ये निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या सगळ्या काळात त्यांचा मुलगा मोहम्मद शमी त्यांच्यासोबत नव्हता. मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण आणि सराव करतो आहे. त्यामुळे त्याला वडिलांच्या सोबत राहण्यास वेळ मिळाला नाही. त्याचा भाऊ आसिफने ‘स्पोर्टसकीडा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, घरच्या लोकांनी मोहम्मदला बेंगळुरूमध्ये जाण्यापासून थांबवले होते. वडील आजारी आहेत. त्यामुळे तू त्यांच्यासोबतच राहा, असा सल्ला घरातील ज्येष्ठ लोकांनी दिला होता. पण देशही माझ्या पित्याप्रमाणेच आहे, असे सांगत त्याने प्रशिक्षण कार्यक्रमाला जाण्याला पसंती दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसिफने म्हटले आहे की, वडिलांना अशा अवस्थेत सोडून जाताना मोहम्मद खूप भावूक झाला होता. पण ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होणे भारतीय टीमसाठी अत्यंत आवश्यक असल्यामुळे त्याने मनावर दगड ठेवून प्रशिक्षणासाठी बेंगळुरूला जाण्याचा निर्णय घेतला. आता मला विश्वास आहे की तो पुढच्या मालिकेमध्ये आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करेल. वडिलांच्या निधनानंतरही मोहम्मद शमी माध्यमांच्या समोर आला नाही. त्याचबरोबर त्यांनी कोणतीही प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही.

मोहम्मद शमीचे वडील तौसिफ अली यांना क्रिकेटबद्दल नितांत आदर होता. त्यांची तब्येत ठिक नसती, तरी त्यांनी मोहम्मद शमीला थांबवून ठेवले नसते. खरंतर क्रिकेट त्यांच्या रक्तामध्ये होते. ते वसीम अक्रम यांचे मोठे चाहते होते. आता ते आमच्यात नाहीत, त्यामुळे आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. विशेषत मोहम्मदला तर त्यांची उणीव भासेल. कारण तो जेव्हा जेव्हा अडचणीत होता, त्यावेळी तेच त्याला शांत करण्याचे काम करीत असत, असे आसिफने सांगितले.

भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेवेळी मोहम्मद शमीला जखम झाला होती. त्यानंतर तो उपचार घेण्यात आणि पुढील मालिकेसाठी सज्ज होण्यात व्यग्र आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी तयार होण्याला त्याचे प्राधान्य आहे. त्यासाठीच तो बेंगळुरुला गेला असल्याचे आसिफने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed shami indian cricket team father dies national cricket academy team india
First published on: 28-01-2017 at 16:21 IST